
अहमदाबादच्या शिखा शाहने कचऱ्यातून पैसे कमवण्याचा फॉर्म्युला शोधून काढला आहे. त्या ‘Altmat’ नावाच्या कंपनीच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
ही कंपनी कृषी कचऱ्यापासून कपडे बनवते. या फायबरचे ब्रँड नाव ‘Altmat’ आहे.
शिखाची कंपनी शेतकऱ्यांकडून शेतीचा कचरा खरेदी करते. दरवर्षी 30 कोटी रुपयांच्या पर्यावरणपूरक फायबरचे उत्पादन कंपनी करते. शिखा शाहच्या ग्राहकांमध्ये युरोप आणि अमेरिकेतील फॉर्च्युन 500 कंपन्यांचा समावेश आहे.
लहानपणापासून मिळाले कचरा व्यवस्थापनाचे धडे
शिखाचे वडील विष्णू शहा हे ऑटोमोबाईल कचऱ्यापासून धातू बनवण्याचा व्यवसाय करायचे. लहानपणापासून शिखा कचऱ्यापासून वस्तू बनवण्याबद्दल ऐकत आणि पाहत होती. निरमा विद्यापीठातून व्यवसायाचे शिक्षण घेतल्यानंतर शिखाने अमेरिकेतील बॅबसन विद्यापीठातून उद्योजकता आणि नेतृत्व या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. आईच्या प्रभावामुळे वयाच्या 19 व्या वर्षी एका एनजीओमध्ये प्रवेश केला.
2019 मध्ये कंपनीचा घातला पाया
शिखाने डिसेंबर 2019 मध्ये AltMate लाँच केले. वडील कंपनीला धोरणात्मक मार्गदर्शन करतात. शिखाला माहित होते की, जवळपास 57 टक्के कपडे पॉलिस्टरचे असतात. प्रत्येक वेळी ते धुतल्यावर त्यातून मायक्रोप्लास्टिक्स बाहेर पडते. हे मानवी शरीराठी हानिकारक आहे.
जगातील 24 टक्के कीटकनाशके जगातील 2.4 टक्के शेतजमिनीवर कापूस पिकवण्यासाठी वापरली जातात. जीन्सच्या तीन जोड्या बनवण्यासाठी 20,000 लिटर पाणी लागू शकते. शिखाला यासाठी पर्याय हवा होता. त्यांची कंपनी वर्षाला 40 लाख कपडे (शर्ट किंवा टी-शर्ट) बनवण्यासाठी पुरेसे फायबर तयार करते. कंपनीचे वार्षिक उत्पादन 1,000 टन फायबर आहे.
Altmat कंपनीने 11 मोठ्या ब्रँड हाऊसशी करार केला आहे. शेतकरी प्रामुख्याने अन्न, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांसाठी पिके घेतात. त्यांच्याकडून कंपनी कृषी कचरा खरेदी करते. गवताचे कापसा सारख्या संरचनेत रूपांतर होते. मग त्यापासून सूत तयार केले जाते. कपडे, सामान (पिशव्या आणि शूज) आणि घराच्या सजावटीच्या वस्तू (कार्पेट इ.) यापासून बनवल्या जातात.
विशेष बाब म्हणजे या फायबरपासून बनवलेले कापड कापूस आणि तागाच्या कापडासारखेच असते आणि ते महाग नसते. Altmat च्या फायबरची किंमत 330 ते 650 रुपये प्रति किलो आहे, ज्यामुळे ते रेशीम आणि लोकरपेक्षा अधिक परवडणारे आहे.
हे फायबर तयार करण्यासाठी फळे, तेलबिया आणि औषधी पिकांच्या टाकाऊ पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. केळी आणि अननस ही काही उदाहरणे आहेत. कंपनी इतर देशांतूनही शेतीचा कचरा आयात करते.
कृषी कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही शेतकऱ्यांसाठी खर्चिक प्रक्रिया आहे. कचरा जाळल्यास घातक प्रदूषण होते. शेतकऱ्यांकडून कचरा खरेदी करून, Altmat शेतकऱ्यांच्या विल्हेवाटीची समस्या सोडवते. त्यामुळे प्रदूषणालाही आळा बसतो.