
पुणे:साधारण वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार असं म्हणालेले की, ‘मुख्यमंत्रीपदासाठी दावा ठेवण्याची आताही तयारी आहे’ पण आता तेच अजित पवार असं म्हणतायेत की, ‘यावेळेस मुख्यमंत्रीपदाच्या भानगडीत पडायचं नाही.’ पण त्यांच्या याच विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आतापर्यंत अजित पवार हे मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी अतिशय आक्रमकपणे आपलं राजकारण करतात असं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. मुख्यमंत्री पदाची त्यांची आकांक्षाही लपून राहिलेली नाही. अशावेळी आता अचानक अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत अशा प्रकारचं भाष्य का केलं असावं याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
‘मी मुख्यमंत्रीपदाच्या भानगडीत पडणार नाही’, पाहा अजितदादा नेमकं काय म्हणाले
अजित पवार यांनी The Bioscope – Marathi या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखती बोलताना म्हटलं की, ‘सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं, आता उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना वाटतं ते मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटतं की, नाना पटोले, बाळासाहेब थोरात किंवा इतर कोणी काँग्रेस नेत्याने मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं. इथे राष्ट्रवादी साहेबाची आहे तिथे.. साहेबांनी अप्रत्यक्षपणे सूतोवाच केलं की, जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे. असं प्रत्येक जण आपआपल्या परीने आपआपल्या पक्षाचा चेहरा पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत.’
मी स्वत: ठरवलंय की, यावेळेस त्या भानगडीत पडायचं नाही. पहिल्यांदा महायुतीच्या 175 जागा महाराष्ट्रात कशा येतील हे पहिले टार्गेट ठेवायचं. त्यामध्ये जर आपण जरा काही कुठे बोललो तर त्यात पुन्हा ब्रेकिंग न्यूज.. अजित पवार मुलाखतीत असं असं म्हणाले…’
‘आता राहिलेत किती दिवस.. यामुळे कमी दिवस राहिले आहेत. यामुळे तुम्हाला माहिती आहे की, यातून नवीन समस्या निर्माण होतील आणि त्यातून नवी काही विषय… आणि काय होतं.. कार्यकर्ते नाराज झाले ना.. अरे हे असं म्हणतात की, आता यांचं बघूच काय ते..’ असं म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत काहीही भाष्य न करणंच पसंत केलं आहे.
महायुतीत कोण होणार मुख्यमंत्री?
महायुतीत नेमकं कोण मुख्यमंत्री होणार हे अद्यापही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. सध्या एकनाथ शिंदे हे जरी मुख्यमंत्री असले तरी पुन्हा तेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असं भाजप किंवा महायुतीकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे महायुतीतील तीनही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते हे आपल्याच पक्षाचा नेता मुख्यमंत्री होईल असा दावा सातत्याने करत आहेत.
मात्र, निवडणुकीत जनता काय कौल देते.. महायुती किंवा महाविकास आघाडी यापैकी कोणाला बहुमत मिळतं, कोणता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरतो.. यावर बरीच गणितं अवलंबून आहेत.