
पुणे:ठाकरे घराण्यातील दुसरे ठाकरे अर्थात अमित हे माहिम मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. ते सभांच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधताना दिसत आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही अमित ठाकरे यांनी लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.
यावरून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमित ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. आदित्य ठाकरेंनी कधीही राज ठाकरेंबद्दल चुकीचे शब्दप्रयोग केले नाही. मात्र, अमित ठाकरे हे उद्धट आहेत, अशा शब्दांत पेडणेकरांनी फटाकरलं आहे. ते ‘एबीपी माझा’शी संवाद साधत होत्या.
किशोरी
पेडणेकर म्हणाल्या, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सख्खे चुलत आणि सख्खे मावस बंधू आहेत. पण, घरातील संस्कार फक्त राज ठाकरे यांच्यापर्यंतच आले आहेत का? अमित ठाकरेंपर्यंत ते आले नाहीत का? कारण अमित ठाकरे उद्धव ठाकरेंच्या स्वभावाबद्दल बोलतात. हे लोक ऐकत आहेत.”
“आदित्य ठाकरे आमदार, मंत्री झाले. सिनेटच्या निवडणुका जिंकल्या. पण, आदित्य ठाकरेंनी कधीही आजमितीपर्यंत राज ठाकरेंबद्दल चुकीचे शब्दप्रयोग केले नाहीत. अमित ठाकरे आक्रमक नाही, तर उद्घट आहेत,” असं पेडणेकरांनी सुनावलं आहे.
“आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यात लोक तुलना करत आहेत. त्यामुळे आक्रमपणा वेगळा आणि उद्धटपणा वेगळा आहे,” असं पेडणेकरांनी म्हटलं.
प्रभादेवीमधील सभेत राज ठाकरेंनी, ‘मी भिका मागणार नाही, स्वत: अमितला निवडून आणणार..’, असं विधान केलं होतं. त्यावर “मग जनतेच्या घरोघरी जाऊन काय जोगवा मागत आहेत का?”, असा सवाल पेडणेकरांनी उपस्थित केला आहे.