
राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून, लवकरच राज्यात महायुती सरकारचा शपथविधी देखील पार पडला आहे. मात्र अजूनही या निकालाच्या आकड्यांबाबतच्या चर्चा सुरू आहे.
कारण भाजपला मिळालेला बहुमताचा आकडा हा अनेकांसाठी धक्कादायक होता. 230 पेक्षा जास्त जागा मिळवल्यानंतर भाजपचा हा विजय ऐतिहासिक मानला जातोय. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 46 जागा मिळाल्या आहेत. तर वंचित आणि मनसेला सुद्धा राज्यात खातं उघडता आलेलं नाही. निकालानंतर आता सर्वच पक्ष विचारमंथन करताना दिसत आहेत. आज मनसेच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी निकालाबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्याचं पाहायला मिळालं.
मुंबईत राज ठाकरेंच्या उपस्थित मनसेच्या नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असल्याचं कळतंय. यामध्ये राज ठाकरे यांच्यासमोर उमेदवारांनी ईव्हीएमबद्दल प्रश्न उपस्थित केला असल्याची माहिती आहे. तसंच भाजपसोबत जाणं ही सुद्धा चूक झाली असं म्हणत उमेदवारांनी राज ठाकरेंसमोर नाराजी व्यक्त केली असं म्हटलं आहे.
राज्यातील मागच्या पाच वर्षांमध्ये झालेल्या घडामोडी पाहता, राज ठाकरे हे महायुतीच्या जवळ असल्याचं पाहायला मिळालं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठींचा सिलसिला पाहायला मिळाला. यावरुन तेव्हा अनेकांना असं स्पष्ट दिसत होतं की, राज ठाकरे हे एकतर महायुतीसोबत असतील किंवा काही जागांवर सहाकार्याच्या भूमिका घेऊन राज ठाकरे उमेदवार देतील. तसंच राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री भाजपचा होईल आणि आम्ही सत्तेत असू अशी विधानं करुन आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र अमित ठाकरे यांच्याविरोधात महायुतीकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपने नेत्यांनी मदत करण्याची भावना व्यक्त केली, मात्र शिंदेंच्या कठोर भूमिकेमुळे त्यावर पुढे काही ठोस निर्णय होऊ शकला नाही. तिथून ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसेला काही महायुतीकडून देण्यात येतील अशी चर्चा होती. मात्र, स्वत: अमित ठाकरे यांनाही महायुतीकडून ठोस निर्णय घेत पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे. यानंतर होणाऱ्या बैठकीत आता नेमका काय निर्णय होणार, राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पुढच्या काही दिवसांमध्येच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही पार पडणार आहेत. या निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांमध्ये मनसे काय भूमिका घेणार यावर आता सर्वांचं लक्ष आहे.