
विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवलं असून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. दरम्यान, आता घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राजभवनावर पोहोचले आहेत.
विधानसभेचा कार्यकाळ संपत असून प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री राजभवनात उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सोपवला.
राज्यात नवं सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा दिला. सोबत दोन्ही मावळते उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री होते. एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांचे आभार मानले. राज्यपालांनी शिंदे सरकारच्या कार्यकाळाचे कौतुक केले.
महायुतीतला तिढा सुटला असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप काही स्पष्ट झालेलं नाही. मात्र महायुती अभेद्य असल्याचे संकेत काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री कोण होणार यासाठी तिन्ही नेते दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
कोण होणार मुख्यमंत्री..?
सोमवारी रात्री भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या घरी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. पण तिथं त्यांची अमित शहा यांची भेट होऊ शकली नाही. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमित शहा मुंबईत येणार असल्याच्या चर्चा आहेत.