
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर महायुतीने आता सत्तास्थापनेसाठीच्या हालचालींना सुरुवात केली आहे. सत्तेमध्ये तीन पक्षांना कसा वाटा मिळणार याची गणिते मांडण्याचे काम सुरू झाले असून सत्तास्थापनेनंतर महाविकास आघाडीला पुन्हा एकदा दणका देण्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ महायुतीने आखला आहे.
निवडणुकीनंतर आधीच तोळामासा असलेल्या महाविकास आघाडीला आणकी कमकुवत करण्यासाठीच्या प्रयत्नांना सुरूवात करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील कोणत्या आमदारांना आपल्या बाजूने वळवायचे हे ठरले असून त्यांना पक्षांतर बंदी कायद्याच्या चौकटीत राहून महायुतीत कसे आणायचे याची व्यूहरचना आखण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसणार?
महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे सर्वाधिक आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे 20 आमदार निवडून आले आहेत. त्याखालोखाल 16 आमदार काँग्रेसचे निवडून आले असून 10 आमदार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत. त्यामुळे मोठा दणका हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देण्याचे ठरवले आहे. सत्तास्थापनेनंतर काही दिवसांत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मोठ्या संख्येने शिंदेंच्या शिवसेनेमध्ये येतील आणि यामध्ये काही मोठे चेहऱ्यांचा समावेश असल्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार उदय सामंत यांनी NDTV मराठीशी बोलताना सांगितले. हे आमदार शिंदेंच्या शिवसेनेत आणताना पक्षांतर बंदी कायद्याचा अडसर येणार नाही इतकी संख्या जुळवली जाईल असेही शिंदेंच्या शिवसेनेतील एका नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. मात्र असे करणे सोपे नाहीये कारण पक्षांतर बंदी कायद्यानुसार संबंधित पक्षाच्या दोन-तृतीयांश सदस्यांनी विलीनीकरणास सहमती दिली तरच ते कारवाईच्या कचाट्यातून सुटू शकतात. यानुसार शिंदेंच्या शिवसेनेला ठाकरेंच्या शिवसेनेचे 14 आमदार आपल्या बाजूने वळवावे लागतील. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांना आपले आमदार फुटण्याची भीती आहे त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेत अडचण येऊ नये यासाठी त्यांनी गटनेतेपदी आदित्य ठाकरेंची निवड केली आहे.
काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही फुटीची धास्ती
जी धास्ती ठाकरेंच्या शिवसेनेला वाटते आहे तीच धास्ती काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही वाटते आहे. पक्षांतरबंदी कायद्याचा भंग न करता या दोन पक्षांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करायचा असेल तर काँग्रेसचे 10 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आमदार आपल्या बाजूने वळवणं भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गरजेचे आहे. भविष्यात असे झाले तर महाविकास आघाडीकडील आमदारांची संख्या ही अवघी 19 इतकी राहील.
बहुमत असतानाही महायुतीला ‘करेक्ट कार्यक्रमाची’ गरज का ?
महायुतीतल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा राग प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. ठाकरेंना धडा शिकवणे हा या दोघांचा प्रमुख उद्देश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही आपलीच आहे हे सिद्ध करण्यासाठी आणि शरद पवारांनंतर आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे प्रमुख नेते आहोत हे दाखवण्यासाठी अजित पवारांना निवडणुकीतील यशानंतर शरद पवारांच्या बाजूला असलेले आमदार आपल्या बाजूने वळवणे हे गरजेचे वाटते आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर महायुतीतील घटक पक्ष विरोधकांना खिळखिळं करण्याची एकही संधी सोडू इच्छित नाहीत. येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनेही आपल्या बाजूने अधिकाधिक आमदार असणे हे महायुतीतील पक्षांना गरजेचे वाटते आहे.