
“महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आघाडी सरकारने गृहलक्ष्मी योजनेची कॉपी करून तिला ‘माझी लाडकी बहीण योजना’ असे नाव दिले.”
बंगळूर : ”स्त्रीची प्रगती झाली तर कुटुंबाची प्रगती होते, राज्य, गावाची प्रगती होते.
म्हणूनच महिलांच्या विकासाला पूरक म्हणून आमच्या हमी योजना आखण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आघाडी सरकारने गृहलक्ष्मी योजनेची कॉपी करून तिला ‘माझी लाडकी बहीण योजना’ असे नाव दिले आणि १५०० रुपये दिले. आम्ही ‘गृहलक्ष्मी’चे (Gruhalakshmi Yojana) नाव ठेवले आणि तीन हजार देण्याचे वचन दिले; पण तेथील भाजप आघाडी सरकारने निवडणुकीच्या सहा महिने आधी पैसे दिल्याने आमच्याहून अधिक मते मिळाल्याची टीका उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी केली.
रविवारी कनकपूर येथे झालेल्या कनकंबरी महिला संघाच्या महिला जागृती परिषदेत बोलताना ते बोलत होते. ”सर्वसामान्य महिलांनी पुढे यावे, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र नेतेमंडळी त्यांची पत्नी, बहीण, मोठी बहीण किंवा नातेवाईक यांनाच संधी देत आहेत.
महिलांना आरक्षण देण्याच्या विधेयकाला संसदेने मंजुरी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) महिलांना ३३ टक्के आरक्षण द्यावे लागेल. त्यासाठी सर्वसामान्य महिलांनी त्यांचे नेतृत्वगुण लगेच विकसित केले पाहिजेत. सर्वसामान्य महिलांनी सत्तेत येण्यासाठी पुढे यावे,” असे आवाहन त्यांनी केले.