
एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाचा राज्यपालांकडे राजीनामा सोपवला आहे. राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा अधिकार काय असतो, नेमका काय फरक असतो? नवीन सरकार कधी स्थापन होणार याबाबत जाणून घेऊया.
मुख्यमंत्र्यांचा अधिकार
मुख्यमंत्री राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात आणि उपमुख्यमंत्र्यांकडून त्या भूमिकेत प्रतिनियुक्ती केली जाऊ शकते. मुख्यमंत्री सामान्यत: मुख्य सचिवांची निवड करतात आणि त्यांच्या राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांना आणि राज्यमंत्र्यांनाही विभाग देऊ शकतात. राज्याच्या विधिमंडळाच्या अनुषंगाने, मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांच्या अंतर्गत खात्यांचे वाटप आणि फेरबदल करण्याचा अधिकार आहे. दुसरीकडे, वेगवेगळ्या प्रकारची मते असल्यास, मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा मागू शकतात.राज्याच्या विधिमंडळाच्या अनुषंगाने, मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांच्या अंतर्गत खात्यांचे वाटप आणि फेरबदल करण्याचा अधिकार आहे. विधानसभेतील मंत्र्यांच्या कामकाजावर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण, मार्गदर्शन आणि समन्वय असतो.
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे अधिकार
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी जबाबदारी दिली आहे. विधानसभेची मुदत संपल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहातात. या कालावधीमध्ये महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांना मंजुरी दिली जात नाही. प्रशासनाचं काम सुरळीत व्हावं म्हणून ही जबाबदारी दिली जाते.
महायुतीला राज्यात मिळालेल्या अभूतपूर्ण यशानंतर आता महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.. भाजप नेत्यांकडून देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी असावं असा आग्रह करण्यात येत आहे. तर तिकडे शिवसेनेच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं असा आग्रह करण्यात येतोय. दरम्यान, मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपकडून विविध भूमिका समोर येत आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या पक्षातील नेत्यांनी यासंदर्भात काही भूमिका मांडल्या असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळतीये.
भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर शिंदेंना दुखावण्याची वरिष्ठांची तयारी नाहीये असं कळतंय. तसेच एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करावं अशी मागणी होत असल्याचंही कळतंय.. तसेच मित्रपक्षांना नेहमी आदराची वागणूक देणारा पक्ष ही प्रतिमा भाजपला जपायचीये त्यामुळे एकनाथ शिंदेंची समजूत घालण्याच्या तयारीत भाजप पक्षश्रेष्ठी असल्याचंही कळतंय.
तिकडे शिवसेनेच्या सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपद स्वत:कडे कायम ठेवण्यासाठी अत्यंत आग्रही असल्याचं बोललं जातंय.. जर शिंदेंना मुख्यमंत्रिपद नाकारलं गेलं तर उद्धव ठाकरे आणि विरोधक भाजपला लक्ष्य करतील असंही बोललं जातंय. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आता अखेर महायुतीत कुणाच्या नावाला हिरवा कंदील मिळणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.