
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यानंतरही महायुतीकडून सत्ता स्थापनेबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नाही. महायुतीचा नवा मुख्यमंत्री कोण, यावर तिढा सुरू झाला आहे.
भाजप आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. तर, शिवसेना शिंदे गटाने एकनाथ शिंदे यांच्या हातीच पुन्हा एकदा सरकारची धुरा देण्याची मागणी केली आहे. तर, तिढा कायम असताना भाजपने आता शिवसेना शिंदे गटाला 72 तासांचा अल्टिमेटम दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
फडणवीसांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड निश्चित आहे. भाजप आमदारांच्या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात येईल. त्यानंतर महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. आता याची औपचारिक घोषणा बाकी असल्याची माहिती समोर सूत्रांनी दिली. शुक्रवारी भाजपचे 2 केंद्रीय निरीक्षक मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे.
शिंदेंना भाजपचा अल्टिमेटम
मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली तरी चालेल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घेतली. तर, शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्या नावाचा आग्रह सुरू आहे. त्यामुळेच महायुतीत तिढा असल्याचे चित्र आहे. अशातच आता भाजपने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 72 तासांची मुदत दिली आहे. भाजपने शिवसेना शिंदे गटाला केंद्रात मंत्रीपद अथवा राज्यात उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. दोन्हीपैकी एकाची निवड करा, असा निरोप भाजपने एकनाथ शिंदे यांना दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी श्रीकांत शिंदे यांचही नाव चर्चेत आहे. आता, भाजपच्या ऑफरवर एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.