
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीला 234 जागा मिळाल्या. त्यात एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागा जिंकल्या आहेत.
या निराशादायी निकालानंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत सातत्याने महायुती सरकारमधील नेत्यांसह निवडणूक आयोगावर बोचरी टीका करताना दिसत आहेत. दरम्यान त्यांनी निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीची लढाई बरोबरीत सुरु होती. पण नंतर पुढच्या दोन तासांत सगळं चित्र बदललं. निकाल आधीच ठरला होता फक्त मतदान करुन घेतलं, मतदान होऊ दिलं. तसंच जे काही घडलं त्याला देशाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड जबाबदार आहेत. त्यांनी सरन्यायाधीश असताना जर वेळेवर आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिला असता तर या गोष्टी घडल्याच नसत्या. तुम्ही निकाल देणार नसाल तर मग त्या खुर्च्यांवर का बसला होता? असा प्रश्न संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विचारला आहे.
यावर एएनआयशी बोलताना चंद्रचूड म्हणाले, “माझं उत्तर अगदी सोपं आहे… या वर्षभरात आम्ही अनेक घटनात्मक खटल्यांवर निकाल दिले. कधी नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचे निर्णय दिला तर कधी सात न्यायाधीशांच्या खंडपीठाचे निर्णय दिला. अगदी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाचे निर्णयही आम्ही हाताळत होतो. आता सुप्रीम कोर्टाने कोणत्या खटल्याची सुनावणी करायची हे कोणी राजकीय एका पक्षाने किंवा व्यक्तीने ठरवावे का? मला माफ करा पण ती निवड सरन्यायाधीशांची आहे,” असं म्हटलं.
“तुमचं असं म्हणणं आहे की आम्ही जितका वेळ काम करणं अपेक्षित असतं त्यापैकी एक मिनिटही काम करत नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयासमोर मागील 20 वर्षांपासून महत्त्वाची घटनात्मक प्रकरणे प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालय ही 20 वर्षे जुनी प्रकरणे का घेत नाही आणि अलीकडील काही प्रकरणे का हाताळत नाही? मग जर तुम्ही जुनी केसेस घेतलीत तर तुम्हाला सांगण्यात येते की, तुम्ही ही विशिष्ट केस घेतली नाही. बरं, तुमच्याकडे मर्यादित मनुष्यबळ आहे आणि तुमच्याकडे न्यायाधीशांचा एखादा गट आहे, या सर्वांचा तुम्हाला मेळ साधावा लागतो,” असंही निवृत्त सरन्यायाधिशांनी म्हटलं.