
विधानसभा निवडणुकीआधी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. ‘एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन’ असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं.
पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सपशेल बॅकफुटला गेली. महायुतीला तब्बल २३० जागा मिळाल्या. महायुतीच्या या मोठ्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या टीकेची धार कमी केल्याचं बोललं जातंय. त्यांनी अलीकडेच देवेंद्र फडणवीसांची घरी जाऊन भेट घेतली आहे.
ठाकरे-फडणवीस यांच्या भेटीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरणं बघायला मिळू शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभेनंतर आता महापालिका निवडणुकीत भाजप आणि ठाकरे गट एकत्र येऊ शकतात, असं बोललं जातंय. याला कारण ठरतंय भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गणेश नाईक व ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यात सभागृहात झालेली भेट. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे खास विश्वासू नेते मानले जातात. नार्वेकर यांनी काल सभागृहातच गणेश नाईक यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली.
या भेटीमुळे महापालिका निवडणुकीत भाजप-ठाकरे एकत्र येऊ शकतात, याबाबत दोन्ही पक्षात प्लॅन सुरू असल्याची अशी चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे आणि भाजप एकत्र आल्यास महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला डच्चू मिळू शकतो, राज्यात वेगळं समीकरण बघायला मिळू शकतं, असं बोललं जातंय.
सभागृहात नेमकं काय घडलं?
विधान परीषदेत शुक्रवारी भाजपचे कॅबिनेट मंत्री गणेश नाईक आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यात तब्बल तासभर चर्चा झाली. शुक्रवारी सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान मिलिंद नार्वेकर हे विरोधी बाकांवरून उठून सत्ताधारी बाकांवर बसलेल्या गणेश नाईक यांच्या शेजारी जाऊन बसले होते. तिथेच बसून दोघंही तासभर चर्चा करत होते. मिलिंद नार्वेकर अचानक अशाप्रकारे सभागृहातच गणेश नाईक यांच्या शेजारी बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दोघांमध्ये आगामी नवी मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे नेते सातत्याने गाठी-भेटी घेत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवे मित्र, नवा डाव असं चित्र तयार होत आहे का?
अशा प्रश्न विचारला जातोय.