
घर किंवा कार खरेदी करायची असल्यास अनेकजण कर्ज घेतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की जर एखाद्या व्यक्तीने बँकेकडून घरासाठी कारसाठी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले आणि कर्ज फेडण्यापूर्वी काही कारणास्तव त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर ती रक्कम कोणाकडून वसूल केली जाते?
कर्ज घेणाऱ्याचा मृत्यू झाला तर बँक कर्ज माफ करते, असा अनेकांचा समज आहे. मात्र, हा खोटा समज आहे. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही बँक कर्ज वसूल करते. बँक कोणाकडून कर्ज वसूल करते ते सविस्तर जाणून घेऊयात.
गृहकर्ज
गृहकर्जाच्या बाबतीत कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, बँक प्रथम सह-कर्जदाराशी संपर्क साधते. त्याला थकीत कर्जाची परतफेड करण्यास सांगते. जर कोणीही सह-कर्जदार उपस्थित नसेल, तर बँक कर्जाच्या जामीनदाराकडे किंवा परतफेडीसाठी कायदेशीर वारसाकडे वळते. जर व्यक्तीने कर्जाचा विमा उतरवला असेल तर बँक विमा कंपनीला कर्ज भरण्यास सांगते. हे सर्व पर्याय उपलब्ध नसल्यास, बँक थकित कर्ज वसूल करण्यासाठी मालमत्तेचा लिलाव करण्याचा पर्याय निवडते.
कार लोन
वाहन कर्जाच्या कालावधीत कर्जदाराचा मृत्यू झाल्यास, बँक उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी कर्जदाराच्या कुटुंबाशी संपर्क साधते. कायदेशीर वारसाने उर्वरित कर्जाची रक्कम देण्यास नकार दिल्यास, बँकेला वाहन पुन्हा ताब्यात घेण्याचा आणि त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी लिलावात विकण्याचा अधिकार आहे.
वैयक्तिक आणि क्रेडिट कार्ड कर्ज
सुरक्षित कर्जाच्या व्यतिरिक्त असुरक्षित कर्ज, म्हणजे वैयक्तिक किंवा क्रेडिट कार्ड कर्ज होय. या कर्जाच्या कालावधीत कर्जदाराचा मृत्यू झाल्यास, बँक थकित रकमेसाठी कायदेशीर वारस किंवा कुटुंबातील सदस्यांवर दबाव आणू शकत नाही. सह-कर्जदार उपस्थित असल्यास, बँक त्या व्यक्तीविरुद्ध वसुलीची कार्यवाही सुरू करू शकते. तथापि, सह-कर्जदार नसताना आणि कर्ज वसूल करण्याचे कोणतेही पर्यायी साधन नसताना, बँक कर्जाचे रूपांतर नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (NPA) मध्ये करते.