
छगन भुजबळ यांचा सवाल
मला मंत्री व्हायचे आहे म्हणून कुणाचातरी राजीनामा घ्यावा, असे माझ्या मनातही नाही, असा पुनरूच्चार करत पुर्ण चौकशी झाली की आका आणि काका या सगळ्यांवर कारवाई करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची घाई कशासाठी, असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी केली जात आहे. यावर माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांनी रोकठोक प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत मुंडेंचा राजीनामा घेण्याची घाई का? असा सवाल करत साप साप म्हणून भुई थोपटणे योग्य नाही. काहीही सिद्ध झालेले नसताना राजीनामा घेणे मी तेलगी प्रकरणात सोसले आहे. राजकारणामध्ये अशा गोष्टी होत असतात. मला वाटते की कुणावरही अन्याय होता कामा नये, असे भुजबळ म्हणाले.
संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असेही भुजबळ यांनी सांगितले.
अजित पवारांनी ते वक्तव्य करायला नको होते
मतदारांबाबत अजित पवारांनी असे बोलायला नको होते, अशी प्रतिक्रियाही भुजबळ यांनी दिली आहे. लोक, मतदार हे देशाचे मालक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तो अधिकार दिला आहे. बाकी मी याबाबत काहीही भाष्य करणार नाही, असेही ते म्हणाले.
माणिकराव कोकाटे उपरे…
माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या टीकालाही भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कोकाटे हे उपरे आहेत. राष्ट्रवादीत प्रवेशासाठी पाच वर्षांपूर्वी त्यांनी आपल्याकडे माणसं पाठविली होती. शरद पवारांना सांगून मी त्यांना पक्षात घेतले. कोकाटे काल आले आहेत. त्यांना मला बोलण्याचा अधिकार काय, असा सवाल भुजबळ यांनी केला.