
मराठा आंदोलक मनोज जरांगेची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तब्येत बरी नसल्याने त्यांना संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशक्तपणा जाणवत असल्याने जरांगे पाटील रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची माहिती आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. आज जालना येथे मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे महाजनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा संपल्यानंतर मनोज जरांगेंना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तब्येत ठीक नसल्याने जरांगेंनी आक्रोश मोर्चात भाषण देखील केले नाही.
मनोज जरांगे काय म्हणाले?
कंबर दुखत आहे, पायऱ्या चढायला उतरायला त्रास होतो, पण उद्या धाराशिव मोर्चा असल्याने मी त्या मोर्चाला जाणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
डॉक्टर काय म्हणाले?
मनोज जरांगे यांनाअखेर उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर प्रदीप चावरे यांनी सांगितले की, जरांगे पाटील यांचा बीपी कमी आहे,पाठदुखी आहे त्यामुळे त्यांचे सिटी स्कॅन करण्यात येणार आहे. रिपोर्ट आल्यावर त्यांच्यावर पुढचे उपचार केले जाणार आहेत.
मनोज जरांगे 25 जानेवारीपासून उपोषणाला बसणार
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची तारीख जाहीर केलेली आहे. 25 जानेवारी 2025 पासून ते अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. हे सामूहिक आमरण उपोषण असेल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ज्यांना स्वेच्छेने उपोषणाला बसायच आहे, ते बसू शकतात. पण कोणावरही जबरदस्ती नसेल असं त्यांनी स्पष्ट केलं. परंतु त्या अगोजरच तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.