
अजित पवार यांचे भावाला टोले
लोकसभेला आम्हाला मोठा फटका बसला पण त्यानंतर सरकारने विविध लोककल्याणकारी निर्णय घेऊन जनतेची मते जिंकली आणि लोकांनीही आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला, अशा शब्दात महायुतीच्या विजयाचे गमक तथा सार उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दौंड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बहूद्देशीय नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नेहमीच्या विनोदी शैलीत त्यांनी आपल्या भाषणात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकवेळची परिस्थिती सांगितली. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्याच्या स्तरावर स्थानिक पातळीवर निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
त्याला वाटलं साहेबांच्या पाठीमागे बारामती आहे पण…
लोकसभेला आमची एकच जागा आल्याने आम्ही विधानसभेला 25 टक्के जागा घेतल्या. अधाशासारख्या जागा मगितल्या नाही पण त्याचा फायदा झाला. मर्यादित ठिकाणी काम करून आम्ही यश मिळवले. विधानसभेवेळी माझ्या भावाला निरोप पाठवला. पोराला निवडणुकीला उभे करू नको पण त्याला वाटले पवारसाहेबांच्या पाठीमागे बारामती आहे. परंतु त्यांना काय माहिती साहेबांच्या नंतर बारामती दादांच्या पाठीमागे उभी आहे, अशी मिश्किल टोलेबाजी अजित पवार यांनी केली.
बंधूंनी पुतण्याला विरोधात उभे केले पण लाडक्या बहिणी पाठीशी राहिल्या
माझ्या विरोधात संपूर्ण खानदान उतरले होते. सगळेजण माझ्याविरोधात लोकसभेसारखाच बारामतीत प्रचार करीत होते. परंतु जरी माझ्या बंधूंनी त्यांच्या मुलाला माझ्याविरोधात उभे केले तरी माझ्या लाडक्या बहिणींनी मला वाचवले आणि लाखभराच्या फरकाने मला विधानसभेत विक्रमी आठव्यांदा पाठवले, असे अभिमानाने अजित पवार यांनी सांगितले. विरोधक आधी म्हणायचे दीड हजारात काय होते, त्यांना आता दिसले दीड हजारात काय होते ते… असा चिमटाही त्यांनी काढला.
बीड प्रकरणात कुणीही दोषी आढळला, तरी त्याला आम्ही सोडणार नाही
बीडचे प्रकरण आम्ही खूप गंभीरपणे घेतले आहे. कुणाहीपर्यंत जरी धागेदोरे पोहोचले तरी त्याला आम्ही माफ करणार नाही. कायदा कायद्याचे काम करेन. तीन स्तरावर याची चौकशी सुरून असून दोषींना शिक्षा होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.