
फडणवीसांनी दिलेल्या युतीच्या संकेतांवर राऊतांची भूमिका
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील राजकीय सूर जुळताना दिसत आहेत. शुक्रवारी नागपूर इथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत, अशा प्रकारचं वक्तव्य केलं.
फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गट आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाची भूमिका स्प्ष्ट केली आहे.
जर तुम्ही राजकीय नेत्यांना तुरुंगात टाकण्याची परंपरा सोडणार असाल तर आम्ही तुमचं स्वागत करू, अशाप्रकारचं वक्तव्य राऊतांनी केलं आहे. शिवाय कोण कुठे जाणार हे देवेंद्र फडणवीस ठरवू शकत नाहीत, असंही संजय राऊत म्हणाले.
राजकारणात काहीही शक्य असतं, या फडणवीसांच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता संजय राऊत म्हणाले, कोण कुठे जाणार आणि कोण कुठे येणार, हे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत. प्रत्येक पक्षाची एक भूमिका विचारधारा असते. तुम्ही आमच्या पक्षाला तोडले आहे, ते कुठल्या विचारधारेत बसते. तुम्ही जर राजकीय नेत्यांना तुरुंगात टाकण्याची परंपरा सोडणार असाल तर आम्ही तुमचे स्वागत करू. मात्र जोपर्यंत ते तानाशाही करतील, जोपर्यंत ते भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन सरकार चालवणार, तोपर्यंत आमचा त्यांच्याशी संघर्ष राहणार, असं वक्तव्य राऊतांनी केलं आहे.
कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतोच. आम्ही 25 वर्षे भाजपचे मित्रच होतो. आम्ही भाजपचे सर्वात विश्वासपात्र मित्र होतो. मात्र आता मित्र राहिलो नाही. महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेते होऊन गेले, पण त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही. केंद्रीय तपास यंत्रणा वापर करून विरोधकांना तुरुंगवास भोगायला लावला नाही. याची सुरुवात भाजपने महाराष्ट्रात केली. ते आता सुधारणार असतील, पर्यावरणाचा संतुलन साधणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असंही राऊत पुढे म्हणाले.