
वाल्मिक कराडच्या गुन्हेगारी साम्राज्याचा आणखी एक धक्कादायक अध्याय समोर आला आहे. त्याचा सहकारी आणि परळीतील कुख्यात गुन्हेगार गोट्या गित्ते याचा पोलिसांच्या ताफ्याचा पाठलाग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाल्मिकला 31 डिसेंबर रोजी केज कोर्टात नेले जात असताना, गोट्या गित्ते पोलिसांच्या गाड्यांच्या मागे जाताना दिसला.
गोट्या गित्ते हा परळीत गावठी कट्टे पुरवणारा मोठा गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, तो गेल्या 15 वर्षांपासून पोलिसांच्या रडारवर आहे. त्याच्या नावावर चोऱ्या, धमक्या, गावठी कट्ट्यांचा साठा, आणि हत्येसारख्या गुन्ह्यांची नोंद आहे.
गोट्या गित्तेकडून 40 गावठी कट्टे जप्त झाले होते.त्याने देहूतल्या तुकोबारायांच्या मंदिरातील मुखवटा चोरल्याची घटना चर्चेत आहे.परळीत शस्त्र पुरवठा आणि टोळीसाठी गुन्हेगारी योजनांमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे उघड झाले आहे.
गोट्या गित्ते गेल्या काही वर्षांपासून वाल्मिक कराडच्या संपर्कात असून, टोळीतील महत्त्वाचा सदस्य म्हणून ओळखला जातो. शस्त्र आणि अवैध गोष्टींचा पुरवठा करणे हे त्याचे मुख्य कार्य असल्याचे समजते.
गोट्या गित्तेसारखा गंभीर गुन्हेगार पोलिसांच्या हातातून सुटत असल्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परळीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, गोट्या गित्ते आणि त्याच्या टोळीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.