
आता शिंदेंच्या नेत्यानं दिला सल्ला, म्हणाले…
शिंदे सेनेचे आमदार आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात होत असलेल्या जवळीकतेवर भाष्य करताना गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधलाय.
अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे आता वाटेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला पाटलांनी लगावला.
गुलाबराव पाटील काय म्हणाले ?
ज्या उद्धव ठाकरेंनी गेल्या काही काळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना तू राहतो का मी राहतो, असं म्हटलं. तेच उद्धव ठाकरे आज त्यांची पप्पी घेतायेत. स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे आता वाटेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यावेळेस कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की विचारधारा सोडू नका, त्याच वेळेस जर ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती, असेही गुलाबराव पाटील यांनी म्हटलेय.
उध्दव ठाकरे शत्रू नाहीत, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर पाटील काय म्हणाले ?
उध्दव ठाकरे शत्रू नाहीत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले होते. त्यावर गुलाबराव पाटील यांनी विधान केलेय. नरेंद्र मोदीजींचं सरकार यावं, यासाठी आम्ही तुमच्यासोबत आलो. याचा विचार देवेंद्र फडणवीस यांनी करावा. यांच्याकडे काहीच राहिला नाही, म्हणून तुमच्याकडे येत आहेत तुमच्याशी गोड गोड बोलत आहेत. मात्र हे कोणाचेच नाहीत, याचा विचार देवेंद्र फडणवीस यांनी करावा, असं मोठं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर केलं आहे.
आपण आपली मूळ धारा सोडलेली आहे, हे उद्धव ठाकरे यांना आता कळलेले आहे. जो बुंदो से गये वो हैदोस से आने वाले नही है. ज्यांनी भगवा सोडला त्यांनी पुन्हा भगवा पकडला की हात थरथरतात, हे आता त्यांच्या लक्षात आलं आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. काँग्रेसचं सध्या काहीच ठिकाणावर नाही. एकमेकांवर कुरघोड्या त्यांच्या सुरू झालेल्या आहे. काही दिवसानंतर हे पक्ष शिल्लक राहतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.