
ई-नाम प्लॅटफॉर्मवर 10 नवीन कृषी मालांचा समावेश ?
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कृषी व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजारपेठ) प्लॅटफॉर्मवर 10 नवीन कृषी मालांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अधिक व्यापक डिजिटल व्यापार संधी मिळणार आहेत.
ई-नाम पोर्टलचा उद्देश काय?
या उपक्रमामागील मुख्य हेतू म्हणजे कृषी मालाची विविधता वाढवणे आणि शेतकरी, व्यापारी यांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी लाभ मिळवून देणे. या निर्णयामुळे कृषी मालाचा व्याप अधिक पारदर्शक, सुलभ आणि गतिमान होणार आहे.
नव्याने समाविष्ट करण्यात आलेले कृषीमाल कोणते?
1) सुकवलेली तुळशीची पाने
2) बेसन (चण्याचे पीठ)
3) गव्हाचे पीठ
4) चना सत्तू (भाजलेले चण्याचे पीठ)
5) शिंगाडा पीठ
6) हिंग
7) सुकवलेली मेथीची पाने
8) शिंगाडा
9) बेबी कॉर्न
10) ड्रॅगन फ्रुट
दरम्यान, वस्तू क्रमांक 4 ते 7 दुय्यम व्यापाराच्या श्रेणीत मोडतात, जे शेतकरी उत्पादक संघटनांना मूल्यवर्धित उत्पादनांचे विपणन सुलभ करते. या वस्तूंसाठी व्यापार करण्यायोग्य मापदंड तयार करण्यात आले असून, त्यास केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची मंजुरी मिळाली आहे.
मापदंड कसा आहे?
पणन आणि तपासणी संचालनालयाने (DMI) या मापदंडांची रचना केली आहे. जे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यात मदत करतील. यामुळे उत्पादनांना चांगली किंमत मिळवता येईल.
काय फायदे मिळणार?
1) डिजिटल व्यापार प्रक्रियेतील पारदर्शकता वाढेल.
2) शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी अधिक बाजारपेठ उपलब्ध होतील.
3) कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणाला गती मिळेल.
हे सर्व नवीन मापदंड ई-नाम पोर्टलवर (enam.gov.in) उपलब्ध असतील. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळण्यास मदत होईल आणि त्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल.