
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ‘आता परिचयच करून देणार नाही’…
विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत आजपासून (ता. ०३ मार्च) सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानमंडळ परिसरात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. आमदार जितेंद्र आव्हाड हे दोन्ही हातात बेड्या घालून आले होते.
विधीमंडळाच्या पायऱ्यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांच्या स्वागतासाठी उभे होते. सभागृहाबाहेर काही घडामोडी चालल्या होत्या, तशाच काहींशा नाट्यमय घडामोडी पहिल्याच दिवशी विधानसभेच्या सभागृहात पाहायला मिळाल्या.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ हा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने झाला. आजपासून सुरू झालेले हे अर्थसंकल्पीय अधिवशेन २६ मार्चपर्यंत चालणार आहे. म्हणजे हे अधिवेशन तब्बल २३ दिवस चालणार आहे. मुख्य म्हणजे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे १थ मार्च रोजी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत, तर विधानसभेत अर्थराज्यमंत्र्यांना अर्थसंकल्प मांडणार आहेत.
राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानंतर वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतांनी विधानसभेत कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी सुरुवातीला नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय हा विषय सभागृहात पुकारला. विधानसभेचे नेते या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा परिचय करून देण्यासाठी उठले.
देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मतदारसंघातून निवडून आलेले विलास सांदिपान भूमरे या सदस्याची ओळख सभागृहाला करून दिली. विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून सभागृहाला हा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होत आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले.
भूमरे यांच्या परिचयाचे निवेदन वाचून झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे बघत ‘कुठे आहेत’ अशी विचारणा केली. मात्र, भूमरे जागेवर नव्हते, त्यामुळे सभागृहात चलबिचल सुरू झाली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘आता परिचयच करून देणार नाही’ अशी भूमिका मांडली. मात्र, ठीक आहे, नवीन आहेत, असे सावरण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या.