
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
वाहतूक सुरक्षिततेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त
गंगाखेड: शहरात मद्यधुंद होऊन वाहन चालवणाऱ्या ४५ जणांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली.परभणी जिल्ह्यात होळी आणि धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार, सार्वजनिक ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष दक्षता घेतली गेली.
गंगाखेड शहरात तसेच ग्रामीण भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, दत्त मंदिर परिसर, स्टेशन नाका आणि संत जनाबाई कमान या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांनी मद्यधुंद होऊन वाहन चालवणाऱ्या ४५ जणांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत कडक कारवाई केली.
या मोहिमेमुळे होळी आणि धुलिवंदन कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय शांततेत पार पडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरे, गंगाखेड पोलीस स्टेशन प्रभारी ऋषिकेश शिंदे आणि त्यांच्या पथकाने केली.या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक, फौजदार, गंगाखेड पोलीस स्टेशनचे संपूर्ण कर्मचारी तसेच आरसीपी पथक परभणी आणि गृहरक्षक दलाच्या जवानांचा समावेश होता.
गंगाखेड पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आणि मद्यपान करून वाहन न चालवण्याचे आवाहन केले आहे.