
जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश…
पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) आजाराचा प्रादुर्भाव गंभीर झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार हा आजार दूषित पाण्यामुळे पसरत असल्याची शक्यता आहे. यावर प्रशासनाने त्वरित उपाययोजना करत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश दिले.
इंद्रायणी नदीचे पाणी पिणे आणि वापरणे भाविकांना पूर्णपणे मनाई करण्यात आले आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन झाले, ज्यामुळे हा दिवस “तुकाराम बीज” म्हणून साजरा केला जातो. या दिव्य सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी देहूत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. देहूत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानिमित्त दरवर्षी पालखी काढली जाते, ज्यात हजारो नागरिक सहभागी होतात. पालखीतील सहभागासाठी वारकरी पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करतात. मात्र, गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) चा प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी तुकाराम बीज सोहळ्याच्या दरम्यान इंद्रायणी नदीचे पाणी पिणे आणि वापरण्यावर मनाई आदेश दिले आहेत, त्यामुळे वारकऱ्यांना सावध राहण्याचे निर्देश दिले आहेत.
तुकाराम बीज सोहळा १४ ते १६ मार्च दरम्यान आहे आणि या दिवशी हजारो वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करून त्याचे पाणी पवित्र मानून पितात. मात्र, गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास आणि स्वयंपाकासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. नदीच्या दोन्ही तीरावरील पाणी अशा उपयोगासाठी योग्य नसल्याने, वारकऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध नळाच्या पाण्याचा वापर करण्याचा आदेश देण्यात आले आहेत.
इंद्रायणी नदीच्या पात्रात कपडे धुणे आणि नदीचे पाणी दूषित करणे टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) चा प्रादुर्भाव पाण्याच्या अशुद्धतेमुळे झाला आहे, आणि हा उद्रेक पुण्यातच घडला आहे. पाण्यात कोलिफॉर्म काउंट आढळल्याने हा आजार पसरला. त्यामुळे, याची खबरदारी म्हणून इंद्रायणी नदीचे पाणी वापरण्यावर कडक मनाई करण्यात आली आहे.