
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
उदगीरमध्ये लवकरच भव्य क्रीडा संकुल उभारणार – युवा खेळाडूंसाठी सुवर्णसंधी
_________________________________
लातूर (उदगीर) : उदगीर तालुक्यातील दावणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा “आ. संजय बनसोडे आमदार चषक 2025” च्या समारोप समारंभात माजी क्रीडा मंत्री आणि आमदार संजय बनसोडे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंनी मेहनत, जिद्द आणि चिकाटीने सराव करून राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवावा, असे आवाहन केले.
माजी क्रीडा मंत्री असताना राज्यातील खेळाडूंच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे सांगताना आ. संजय बनसोडे म्हणाले की, “गेल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात क्रीडा विभागाच्या मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताना राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या. ग्रामीण भागातील खेळाडूंना देशपातळीवर संधी मिळावी यासाठी स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, फुटबॉल डे-नाईट सामने आणि मिनिस्टर ट्रॉफी सारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे खेळाडूंना व्यासपीठ मिळाले आणि त्यांचे मनोबल वाढले.”
दावणगाव येथे आयोजित आ. संजय बनसोडे आमदार चषक 2025 क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील विविध संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील अंतिम सामना दावणगाव विरुद्ध शेकापूर यांच्यात रंगला. या सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आ. संजय बनसोडे यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आजचा सामना टी-10 स्वरूपाचा असल्याने मोठी चुरस पहायला मिळेल.”
उदगीरमध्ये लवकरच क्रीडा संकुल उभारणार
क्रीडा क्षेत्राचा अधिकाधिक विकास करण्यासाठी उदगीरमध्ये मोठे क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी आ. बनसोडे यांनी केली. “ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात म्हणून लवकरच क्रीडा संकुल उभारण्यात येईल. यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना व्यावसायिक पातळीवर प्रशिक्षण घेता येईल.”
या समारंभास प्रा. श्याम डावळे, धानाजी मुळे, राजकुमार बिरादार, यशवंतराव ढगे, योगेश फुले, यादवराव केंद्रे, रमेश भंडे, लक्ष्मण कुंडगिर, विश्वनाथ भंडे, युसूफ घाडीवाले यांसह अनेक क्रीडाप्रेमी आणि क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळणार
संपूर्ण जिल्ह्यात अशा प्रकारच्या स्पर्धा नियमितपणे आयोजित करून खेळाडूंना उत्तम संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केला. “जिल्ह्यातील युवा खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करावे आणि आपल्या गावाचे तसेच जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे” असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित खेळाडूंना उत्तम खेळीसाठी शुभेच्छा देत स्पर्धेतील विजेत्या संघांचा सत्कार करण्यात आला.