दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी- अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 2018 पूर्वी नोंदणीकृत वाहनांच्या नंबर प्लेट शासनानेच बदलून द्याव्यात तसेच उदगीर शहरातील वाढीव पाणीपट्टी कमी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा दक्षता समितीचे अशासकीय सदस्य अभिजीत औटे यांनी केली आहे.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित झालेल्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हा दक्षता समितीचे सचिव उपस्थित होते. अभिजीत औटे यांनी स्पष्ट केले की, शासनाने 2018 पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी नवीन नंबर प्लेट बसवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, वाहनधारकांनी गाडी खरेदी करताना त्यासाठी आधीच पैसे भरलेले आहेत. त्यामुळे, नवीन नंबर प्लेट्स बसवण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी आणि वाहनधारकांकडून त्यासाठी वेगळा खर्च वसूल करू नये.
पाणीपट्टी वाढीव, नागरिकांवर आर्थिक भार
औटे यांनी यावेळी उदगीर शहरातील वाढीव पाणीपट्टीचा मुद्दाही उपस्थित केला. इतर तालुक्यांच्या तुलनेत उदगीरमध्ये पाणीपट्टी जास्त आकारली जात आहे. याचा आर्थिक भार सामान्य नागरिकांवर पडत असून, त्यात मोठी कपात करावी, अशी मागणी त्यांनी केली.
या मागण्यांचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सचिव, जिल्हा दक्षता समिती यांना देण्यात आले असून, लवकरात लवकर या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही अभिजीत औटे यांनी सांगितले.
यासंदर्भात प्रशासन लवकरच योग्य तो निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.