
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर
वन्नाळी येथील इंग्रजी शाळेचे संस्थाचालक विजय जोगुलवार यांच्या सीएनजीवर चालणाऱ्या ओमनी गाडीतील सिलेंडरचा स्फोट होऊन गाडीने पेट घेतला. ही आग आजूबाजूच्या दुकानांना लागल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे.ही घटना १७ मार्चच्या सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
वन्नाळी ता. देगलूर येथे गावातीलच विजय हणमंत जोरगुलवार यांची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेचे विद्यार्थी ने-आण करण्यासाठी संस्थाचालक ओमनी गाडीचा वापर करीत असत. दि.१७ मार्च रोजी शाळेची वेळ संपल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी ओमनी गाडी बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या स्वतःच्या किराणा दुकानासमोर उभी केली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विजय जोरगुलवार यांनी गाडी चालू करण्याचा प्रयत्न करताच गाडीतील सिलेंडरचा प्रचंड स्फोट झाला. या स्फोटामुळे विजय जोरगुलवार जखमी झाले.त्यांना देगलूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.गाडीला लागलेल्या आगीमुळे विजय जोरगुलवार यांचे किराणा दुकान जळून खाक झाले. सद्दाम महबूब शेख यांचे घर,मन्मथ मोबाईल शॉपी,चांद मिस्त्रीचे सिमेंटचे दुकान, रमेश इबितवार यांचे हेअर कटिंग सलूनसह आजूबाजूच्या काही दुकानांना आग लागली.ही आग वरचेवर वाढत गेली.आग लागल्याची माहिती मिळताच देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळाकडे गाव घेतली.त्यांनी अग्निशामक दलाला पाचरण केले.अग्निशामक दल, पोलीस आणि गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.ऐन बस स्थानकावरच लागलेल्या प्रचंड आगीमुळे इतर वाहनाचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाने देगलूर आणि नांदेडकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक थांबविली होती.त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.वृत्त लिहून होईपर्यंत या आगीमुळे आजूबाजूच्या घराचे आणि दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.