
बिग बॉस फेम सूरज चव्हाण ‘झापुक झुपूक’ सिनेमाचं पोस्टर घेऊन जेजुरीत – भंडारा उधळून खंडोबाला साकडं
सोशल मीडिया स्टार आणि ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याच मंचावर ‘झापुक झुपूक’ सिनेमाची घोषणा केली होती. डिसेंबर 2024 मध्ये सिनेमाचा मुहूर्त सोहळा पार पडला असून आता चित्रपटाचं चित्रिकरणही पूर्ण झालं आहे. अशातच आता लवकरच सूरजचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूरज चव्हाण आता रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.
नुकताच सूरज चव्हाण आपल्या सिनेमाचं पोस्टर घेऊन जेजुरी गडावर खंडेरायाच्या चरणी लीन झाला. याचा व्हिडीओ दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सूरज चव्हाण येळकोट येळकोट जय मल्हार असा जयजयकार करताना दिसत आहे. तसेच, त्याच्या हातात ‘झापुक झुपूक’ सिनेमाचं पोस्टर आहे. सूरज जेजुरी गडाची पायरी चढतो आणि येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करतो. तसेच, पुढे सूरज खंडेरायाच्या चरणी साकडंही घालतो. सूरज चव्हाण म्हणतो की,खंडोबा पप्पा तुमच्या दर्शनाला आलो आहे. माझा पिक्चर सुपर डुपर हिट झाला पाहिजे.
सूरज गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतो आणि त्याच्या चित्रपटाचं पोस्टर खंडोबा चरणी ठेवतो. गाभाऱ्यात खंडोबाच्या नावाचा जयघोष करत पुन्हा एकदा खंडेरायाला साकडं घालतो आणि म्हणतो की, देवबाप्पा मी तुमच्या दारात आलो आहे. येत्या 25 तारखेला माझा ‘झापुक झुपूक’ चित्रपट येत आहे. मला असा आशीर्वाद द्या की, माझा चित्रपट मार्केट मध्ये धिंगाणा घालू द्या. तुमचा लेक तुमच्या भेटीला आलो आहे धन्यवाद. सूरजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करून अनेकजण सूरजला त्याच्या नव्या चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.
दरम्यान, सूरज चव्हाणचा आगामी चित्रपट ‘झापुक झुपूक’चं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. सूरजसोबतच या चित्रपटात इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत, पुष्कराज चिरपूटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार झळकणार आहेत. तर, या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, बेला शिंदे आणि जिओ स्टुडिओजनं केली आहे. येत्या 25 एप्रिलपासून ‘झापुक झुपूक’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.