
बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य !
अमरावती: औरंगजेबाची कबर हटवण्याच्या वादावरून सोमवारी सांयकाळी नागपूरमध्ये दंगल उसळली आहे. येथील महाल परिसरात दोन गटात तुफान राडा झाला आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत काही गाड्या आणि घरं पेटवली आहे.
या राड्यामुळे रात्री उशिरापर्यंत नागपुरात तणाव निर्माण झाला होता. सध्या इथं पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.
या सगळ्या घडामोडींवर आता प्रहारचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याच्या घरात दंगल होत असेल तर यासारखी दुर्दैवी बाब नाही, अशी टीका माजी मंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. ते अमरावतीत न्यूज १८ लोकमतशी बोलत होते. ही दगडफेक आणि जाळपोळ बाहेरून आलेल्या लोकांनी केली, या सत्ताधारी पक्षाच्या दाव्यावर देखील बच्चू कडूंनी टीकास्र सोडलं.
बच्चू कडू नक्की काय म्हणाले
मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या घरात दंगल होत असेल, तर यासारखी दुर्दैवी बाब नाही. राज्यात ज्यांनी मोर्चे काढले किंवा ज्यांना औरंगजेबाची जर कबर उखडून फोकायची आहे, त्यांचीच केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. सरकार त्यांचं ऐकत नसेल, दोन्हीकडे सत्ता असतानाही जर त्यांना मोर्चे काढावे लागत असेल तर यासारखी दुर्दैवी दुसरी बाब जगात कोणतीही नसेल.
छावा चित्रपट आता आला आहे. पण हा साडेतीनशे वर्षांचा इतिहास आहे. पिक्चर पाहून लोक भडकलेले दिसतात. याचा अर्थ अनेकांना इतिहासच माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना हे अपेक्षित नव्हतं. शिवाजी महाराजांनी अफजल खानाची कबर स्वत: प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली होती. तिथे दिवाबत्ती केली होती.
मेल्यानंतर शत्रुत्व जातं ही भारताची संस्कृती आहे. त्यामुळे ज्या समाजकंटकांनी दंगल भडकवली, त्या दोघांवरही कारवाई झाले पाहिजे, अशी मागणी माजी मंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.
नागपूरमधील दंगल बाहेरच्या लोकांनी घडवली, या भाजप आमदार प्रवीण दटके यांच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, जिथे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत, तिथे दंगल होत असेल तर तुमचं पोलीस प्रशासन किती कुचकामी आहे, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
सध्या नागपुरात तणावपूर्ण शांतता आहे. जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडल्यानंतर नागपूरमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनर्थ घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. पोलीस प्रशासनाकडून जमावबंदीचा आदेश लागू लोकांना घराबाहेर न पडण्याचं आणि परिसरात शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे.