
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण): शहरातील गोदापात्रात वारकरी संप्रदायातील शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना (ता. 20) गुरुवारी घडली. चैतन्य अंकुश बदर वय 12 वर्षे व भोलेनाथ कैलास पवळे वय 10 वर्षे असे मृत झालेल्या मुलांचे नाव आहेत. शहरात एका वारकरी शिक्षण संस्थेत शिकत असलेले दोन बाल वारकरी मुले गोदावरी पात्रात आंघोळीसाठी गेले असता, आंघोळ करत असतानाच खड्डेमय पाण्यात बुडाल्याने त्यांना जीव गमवावा लागला आहे. वाळू तस्करीमुळे गोदावरीत ठीक ठिकाणी खड्डे पडले असल्याने निरागस बालकाचा जीव गेल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल यांच्या पोलीस पथकाने स्थानिक मच्छीमार युवक व अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने शोध कार्य सुरू करून मृत देह बाहेर काढले.