
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड:जागतिक ग्राहक जागरण पंधरवाड्यानिमित्त गंगाखेड तहसील कार्यालय येथे ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले. तहसील प्रशासनाच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमात ग्राहक संरक्षण परिषदेचे पदाधिकारी, तहसील प्रशासन व रास्त भाव दुकानदार संघटनेच्या सदस्यांनी ग्राहक हक्कांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. तहसीलचे पुरवठा निरीक्षक तथा नायब तहसीलदार प्रीतम डोडल यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष गोपाळ मंत्री, सचिव ताजुद्दीन सय्यद, कोषाध्यक्ष महेमूद शेख, पत्रकार राहुल साबणे आदींनी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी मार्गदर्शन केले.
गोपाळ मंत्री यांनी ग्राहकांच्या फसवणुकीच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करत जागरूक ग्राहक होण्याचे आवाहन केले. त्यांनी सायबर गुन्हेगारीपासून सावध राहण्याची आणि फसवणूक झाल्यास त्वरित ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुद्धोधन सावंत यांनी केले, तर आभार रामराव राठोड आणि गंगाधर कदम यांनी मानले. तहसील प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.