
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी- अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :उदगीर शहरातील विकासकामांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भगीरथ राजा नगर जळकोट रोडसह शहरालगतच्या विविध भागांमध्ये रस्ते व नाल्यांच्या बांधकामाची कामे रखडली असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना अस्वच्छतेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषदेकडून सुरू करण्यात आलेल्या या कामांमध्ये अतिक्रमणाचा मुद्दा पुढे करून कामे थांबवली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून (नोव्हेंबर-डिसेंबरपासून) भगीरथ राजा नगर, गोविंदशेशी शिंदे नगर निवास, धोंड कॉलनी, कमलेश्वर विद्यालय, महाविद्यालय रोड, बौद्ध सोसायटी, शिवनगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, म्हाडा कॉलनी आदी भागांमध्ये रस्ते आणि नालीच्या कामांसाठी खोदकाम सुरू करण्यात आले होते. मात्र, ही कामे पूर्ण होत नसल्याने मोठमोठे खड्डे तसेच असुरक्षित भाग निर्माण झाले आहेत.
विशेष म्हणजे, या कामांमध्ये स्थानिक पातळीवरील काही ठेकेदार व मजूर सहकारी संस्थांना प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात यामागे राजकीय दबाव आणि अपारदर्शकता असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नागरिकांनी या कामांच्या दर्जाबाबत वारंवार तक्रारी केल्या, परंतु नगरपरिषदेच्या अभियंत्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नाही.
या कामांमुळे नागरिकांना होणारा त्रास वाढत असून, परिसरात दुर्गंधी, कचऱ्याचे साम्राज्य आणि अपुऱ्या नाल्यांमुळे साचलेले सांडपाणी यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील विकासकामे पारदर्शक आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.
____________________________________
विकासाचा वेग की अपारदर्शक व्यवहार?
रस्ते-नालीच्या रखडलेल्या कामांमागे ठेकेदार आणि राजकीय दबावाचे गूढ!
उदगीरच्या रखडलेल्या विकासकामांमागे नेमकी कोणती साखळी कार्यरत आहे? ठरावीक ठेकेदारांना मिळणाऱ्या कामांमागील राजकीय संबंध काय आहेत? नागरिकांच्या तक्रारींनंतरही प्रशासन गप्प का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचा उद्याच्या अंकात “भाग – २”– उदगीर शहराच्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या अपारदर्शक व्यवहारांची सखोल माहिती!
____________________________________