
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :मातंग समाजावर सातत्याने होणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि निर्दय हत्या याच्या विरोधात मातंग समाज तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उदगीर येथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
मोर्चाची सुरुवात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे पुतळा येथून करण्यात आली. मोर्चेकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे धडक मारली. याठिकाणी मोर्चाचा समारोप करण्यात आला आणि शासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
न्यायासाठी काढलेला आक्रोश मोर्चा
मातंग समाजावर होत असलेल्या क्रूर हत्याकांड व अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या मोर्चात मयत तानाजी बाबुराव सोनकांबळे (उदगीर), मयत आनंद गोतावळे (वांजरवाडा, ता. जळकोट) आणि परभणीतील 10 वर्षीय बालिकेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाला न्याय मिळावा, या मागणीसाठी समाजबांधव मोठ्या संख्येने एकवटले होते.
याशिवाय मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या देखील हा मोर्चाचा प्रमुख मुद्दा होता. या सर्व प्रकरणांचा फास्ट ट्रॅक कोर्टात जलदगतीने निकाल लागावा आणि दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा मुद्दा
यावेळी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, तो म्हणजे उदगीर येथील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास वक्फ बोर्डाने दिलेली स्थगिती तत्काळ उठवावी आणि स्मारकाचे बांधकाम पूर्ण करावे. या मागणीसाठी मोर्चेकऱ्यांनी शासनाला इशारा दिला की, जर स्मारकाच्या उभारणीवर असलेली स्थगिती लवकरात लवकर उठवली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
—————————————-
निवेदन तहसीलदारांना सुपूर्द
या मोर्चाचा शेवट तहसीलदार राम बोरगावकर यांना निवेदन देऊन करण्यात आला. या निवेदनात वरील सर्व मागण्यांचा समावेश होता. मोर्चेकऱ्यांनी शासनाला कडक शब्दांत इशारा दिला की, जर या मागण्या त्वरित पूर्ण झाल्या नाहीत, तर मातंग समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.
या जन आक्रोश मोर्चामध्ये विविध संघटनांचे कार्यकर्ते व मातंग समाजातील नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामध्ये पंडित सूर्यवंशी, जवाहरलाल कांबळे, बंटी कसबे, संग्राम अंधारे, राज क्षिरसागर, राजाभाई सूर्यवंशी, रविंद्र बेद्रे, पप्पु गायकवाड, बालाजी गवारे, अॅड. व्यंकट कांबळे, बंटी भाऊ कसबे, प्रा. बिभीषन मद्देवाड, बालाजी रणदिवे, अर्जुन जाधव, तातेराव शिंदे, राजकुमार गंडारे, सतिष कांबळे, देविलाल कांबळे, संजय गायकवाड, टी.जी. गायकवाड, प्रल्हाद येवरीकर, अरविंद शिंदे, विश्वनाथ गायकवाड, उध्दव शिंदे, पांडुरंग कसबे, नागनाथ वाघमारे, संतोष कांबळे, दयानंद गायकवाड, सुरज कांबळे, महेश धावरे, किरण सुर्यवंशी, करण अंधारे, मारोती गायकवाड, दीपक गायकवाड, वर्षाराणी धावरे, अनिता बिरादार, संदेश कांबळे, नागेश गुंडीले, ऋषी लांडगे, शांतीलाल कांबळे, सतीश चव्हाण, रामेश्वर शिंदे आदींचा सहभाग होता.
हकनाक मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती
या मोर्चात मयत तानाजी सोनकांबळे यांच्या पत्नी रेश्मा तानाजी सोनकांबळे आपल्या मुलांसह उपस्थित होत्या. तसेच वांजरवाडा येथील मयत आनंद गोताळे यांचे आई-वडीलही या आंदोलनात सहभागी झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे मोर्चात एक वेगळाच आक्रोश पाहायला मिळाला.
____________________________
समाजाच्या न्यायहक्कासाठी पुढील पावले
या मोर्चाच्या माध्यमातून मातंग समाजाने सरकार आणि प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला आहे की, अन्यायाविरोधात ते शांत बसणार नाहीत. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर यापेक्षा मोठे आंदोलन उभे राहील आणि शासनाला जाब द्यावा लागेल.
____________________________