
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी -सुधीर घाटाळ
४ एप्रिल २०२५ – आदिवासी सेवक आप्पा भोये यांच्या पत्नी प्रभावती दावजी भोये यांचे बुधवारी पहाटे कासा येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या.प्रभावती भोये यांनी आयुष्यभर समाजसेवेत सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या निधनाने समाजसेवेसाठी समर्पित जीवन जगलेल्या कर्तृत्ववान व्यक्तीला समाज आदरांजली अर्पण करत आहे. आप्पा भोये यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात त्या खांद्याला खांदा लावून सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या मनमिळाऊ आणि संयमी स्वभावामुळे त्या सर्वांच्या प्रिय होत्या.
त्यांच्या पश्चात पती, पाच मुली, एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला माजी आमदार आनंद ठाकूर, माजी आमदार अमित घोडा, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग बेलकर, राहुल धूम, हरेश मुकणे, रवी जोग, शैलेश घाररपुरे यांच्यासह अनेक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका
प्रभावती भोये यांचे मूळगाव जव्हार तालुक्यातील उक्षीपाडा आहे. १९५४ साली आप्पा भोये यांच्यासह त्यांनी कासा येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सर्वोदय मंडळाच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेची सुरुवात केली आणि आयुष्यभर समाजासाठी कार्यरत राहिल्या.त्यांच्या निधनाने भोये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजता कासा येथील सुर्या नदीच्या किनारी दशक्रिया विधी पार पडणार आहे. त्यांच्या स्मृती समाजसेवेसाठी सदैव प्रेरणादायी राहतील.