
दैनिक चालु वार्ता कारंजा लाड-अशोकराव उपाध्ये
राज्य परिवहन मंडळाचे कारंजा आगार हे वाशिम, अमरावती, अकोला आणि यवतमाळ या चारही महत्त्वाच्या जिल्ह्या मध्ये वसलेले असल्यामुळे येथून महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि बस सेवेच्या गरजेची दखल घेत आमदार सईताई डहाके यांच्या प्रयत्नाने कारंजा आगाराला पाच नवीन एस.टी. बसेस प्राप्त झाल्या आहेत.
या बसेसच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन दिनांक १ एप्रिल २०२५ मंगळवार रोजी स्थानिक कारंजा बस स्थानक येथे आमदार सईताई डहाके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष श्री. देवेंद्र ताथोड, आगार व्यवस्थापक रविंद्र मोरे , युवा नेते देवव्रत डहाके, माजी नगरपरिषद गटनेता नितीन गढवाले, माजी नगरसेवक प्रसन्ना पळसकर, माजी नगरसेविका श्रीमती प्राजक्ता माहीतकर, कौस्तुभ डहाके आणि अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात आगार प्रमुख रविंद्र मोरे यांनी सांगितले की, “कारंजा आगारातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. मागील वर्षातच आगाराने ४० लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. त्यामुळे आणखी बसेसची आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेऊन आमदार श्रीमती सईताई प्रकाश दादा डहाके यांनी राज्य परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आणि अखेर आगाराला ५ नवीन बसेस प्राप्त झाल्या. यामुळे प्रवाशांची सोय होणार असून, आगाराच्या उत्पन्नातही वाढ होईल.”
अध्यक्षीय भाषणात आमदार सईताई डहाके म्हणाल्या, “कारंजा आगाराला बसेसची मोठी गरज असल्याने परिवहन मंत्री आमदार प्रतापराव सरनाईक यांच्याशी पत्रव्यवहार करून आम्ही एकूण १० बसेसची मागणी केली होती. त्यापैकी सध्या ५ बसेस मिळाल्या असून, उर्वरित ५ बसेस लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील.”
यानंतर आमदार सईताई डहाके यांच्या हस्ते ५ एस.टी. बसेसचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले. उदघाटनानंतर आमदार व प्रमुख पाहुण्यांनी नवीन बसमध्ये थोडा प्रवास करून प्रवाशांच्या सोयीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आगारातील महिलांसाठी आवश्यक स्वच्छतागृह सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले तसेच आगाराच्या अन्य गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. सफाई कर्मचारी सुरज याने सातत्याने केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्याचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला परिसरातील नागरिक,व कारंजा आगारातील कर्मचारी संजय भिवकर, रितेश बाबरे, कल्याणी राऊत, गंगा आंबटपुरे मॅडम, संजय पवार, मीर अली इत्यादि आगारातील चालक, वाहक कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श् श्याम सवाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन कारंजा आगारातील कर्मचारी ठाकरे यांनी केले.