
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी –
लोहा तालुक्यातील अंतेश्वर येथील दीडशे कोटींच्या बंधाऱ्यातून अहमदपुर तालुक्यात पाणी नेण्यासाठी चार हजार कोटीचा खर्च म्हणजे चार आणे की कोंबडी बारा आणेका मसाला असा सवाल अंतेश्वर बंधारा -धोंड प्रकल्प -ललिंबोटी धरण व मन्याड संघर्ष समितीने लोहा तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलनात केला.
आज दि. १-४-२०२५ रोजी लोहा तालुक्यातील अंतेश्वर बंधाऱ्याचे पाणी अहमदपुर तालुक्यात नेऊ म्हणून अंतेश्वर बंधारा -धोंड प्रकल्प -लिंबोटी धरण व मन्याड धरण संघर्ष समितीच्या वतीने प्रचंड धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी अंतेश्वर बंधारा बचाव समितीचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, मार्गदर्शक डॉ. सुनील धोंडगे, मार्गदर्शक -माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड विजय धोंडगे, मार्गदर्शक ॲड चंद्रसेन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल शेटकर माजी पं. स. सभापती बालाजी पांडागळे,माजी पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण, माधव पाटील अनकाडे, विजय केंद्रे, बबन हुलसुरे यांच्यासहित समितीचे सर्व सदस्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोहा तहसीलदार यांना पुढील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
अंतेश्वर बंधारा -धोंड प्रकल्प -लिंबोटी धरण व मन्याड संघर्ष समितीच्या धरणे आंदोलनातील प्रमुख मागण्या:-अंतेश्वर बंधारा येथुन लोहा तालुक्यातील हक्काचे लिफ्ट द्वारे अहमदपुरला जाणारे पाणी त्यांची मान्यता रद्द करुन सदरील प्रकल्पातुन लोहा तालुक्यातील गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे,धोंड प्रकल्पाला पुरेसा निधी उपलब्ध करून देऊन सदरील धरणाचे काम दोन वर्षांत पुर्ण करुन शेतीला पाणी द्यावे, लिंबोटी धरणातुन माळेगाव,माळाकोळी परिसरातील शेतीला पाणी देण्यासाठी तत्वतः मंजुरी मिळालेली जय मल्हार उपसिंचन योजनेस नव्याने मान्यता देऊन सदरील योजनेस भरघोस निधी उपलब्ध करुन द्यावा, कलंबर पुच्छ वितरीका योजनेस नव्याने मान्यता देऊन सदरील योजना कार्यान्वित करावी, यापुढे लोहा -कंधार तालुक्यातील धरणाचे हक्काचे पाणी इतर जिल्ह्यांस देण्यात येऊ नये या प्रमुख पाच मागण्या करण्यात आल्या.
यावेळी बोलताना अंतेश्वर बंधारा संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार म्हणाले की, अंतेश्वर येथील दीडशे कोटींच्या बंधाऱ्यातून अहमदपुर तालुक्यात पाणी नेण्यासाठी चार हजार कोटी खर्च म्हणजे चार आणे की कोंबडी बारा आणेका मसाला असे आहे. अंतेश्वर बंधाऱ्यातील पाणी लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीलाच मिळावे बाहेर जिल्ह्यात जाऊ नये यासाठी आम्हाला रस्ता रोको आंदोलन करावे लागेल वेळ पडल्यास रक्ताचा सडा साडला तरी चालेल पण आम्ही येथील पाणी अहमदपुरला जाऊ देणार नाही.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड विजय धोंडगे म्हणाले की, अहमदपुर, उदगीर, जळकोटसह ६५ गावाला पाणी गेले व ते का जाते व कुणाच्या काळात जाते . आपले लोकप्रतिनिधी म्हणतात एक थेंब ही पाणी जाऊ देईना तर दुसरीकडे म्हणतात काम कधी होईल. १० वर्षात धोंड प्रकल्पाला निधी मिळत नाही. लोकशाही असताना हुकुमशाहीची भाषा वापरतात .
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड चंद्रसेन पाटील सुरनर म्हणाले की, अंतेश्वर बंधारा येथुन लातूर जिल्ह्यात पाणी जात आहे त्याला आळा घातला पाहिजे. या मतदार संघातील शेकडो एकर जमीन वाळवंट झाली आहे. त्या जमिनीला पाणी मिळाले पाहिजे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.सुनिल धोंडगे म्हणाले की, या संघर्ष समितीला कुणी हलक्यात घेऊ नका पुढच्या काळात आंदोलन गावागावात जाऊन युवकांची व शेतकऱ्यांची स्वाक्षरी मोहीम घेण्यात येईल. १ में पर्यंत पहिल्या टप्प्यातील आंदोलन चालेल याची जर शासनाने दखल घेतली नाही तर १ जुन नंतर साखळी उपोषण करण्यात येईल व यापुढेही शासनाने आमची मागणी मान्य केली नाही तर लोहा व माळाकोळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.