
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
बारामती (पुणे)तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची रविवारी (दि. ३०) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगता झाली. त्यानंतर गेल्या साडेचार महिन्यांपासून कारखाना परिसरात राहणाऱ्या ऊसतोड कामगारांची घरी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
गुढीपाडवा सण पालावरच साजरा केल्यानंतर कामगारांची गावी जाण्याची तयारी सुरू झाली आहे. दुष्काळी परिस्थिती, गावाकडे रोजगार नसणे, जनावरांच्या चाऱ्याची कमतरता, पाण्याचे दुर्भिक्ष्य यांमुळे अनेक ऊसतोड कामगार कारखाना परिसरातच मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. काही जणांचे या परिसरातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने ते याच परिसरात स्थायिक झाले आहेत. उर्वरित कामगार आपले संसारोपयोगी साहित्य, कपडे, धान्य, जनावरे आदी साहित्य वाहनांत भरून गावी जाण्याची तयारी करीत आहेत.
कारखान्याच्या वतीने बैलगाड्या जमा करण्याचे काम सुरू आहे. बीड, धाराशिव, लातूर, जालना, पाटोदा, यवतमाळ, चाळीसगाव, अहिल्यानगर आदी भागांतील सुमारे आठ हजार कामगार हंगाम काळात सोमेश्वर परिसरात दाखल होत असतात. या ठिकाणी जनावरांना चारा आणि पाण्याची व्यवस्था होते. तसेच,बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांकडे काम मिळत असल्याने काही महिने संसाराची काळजी मिटते. यामुळे शेकडो कामगार या परिसरात मुक्काम करतात.
स्थानिक बाजारपेठेवर परिणाम
हंगाम बंद झाल्याने कारखाना परिसर ओस पडणार आहे. त्यामुळे येथील बाजारपेठेवर काहीसा परिणाम जाणवणार आहे. मात्र, हंगाम सुरळीत पार पडल्याचे समाधान या कामगारांच्या चेहऱ्यावर दिसत होते. गावी पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही मोठा प्रश्न उभा आहे. पाऊस होताच गावाकडे शेतातील कामे करणार असल्याची प्रतिक्रिया ऊसतोड कामगारांनी दिली.
……. सभासद, अधिकारी, कामगार, ऊस वाहतूकदार, संचालक मंडळ यांच्या सहकायनि गाळप हंगाम यशस्वी पार पडला. सोमेश्वरने १२ लाख २५ हजार टन गाळप केले. १२.७ चा उच्चांकी साखर उतारा राखला. ३१७३ रुपये एफआरपी सभासदांच्या खात्यावर वर्ग केली आहे. राज्यात उच्चांकी दराची परंपरा कायम राखली जाईल.
पुरुषोत्तम जगताप,
अध्यक्ष सोमेश्वर सहकारी साखर कारखाना