
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :मॉन्सून काळात संभाव्य पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी आवश्यक पूर्वतयारी करून सतर्क राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या मॉन्सूनपूर्व आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
बैठकीला मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, लातूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. जाधव यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, लातूर पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्त्वाच्या सूचना
जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आपत्तीपूर्व तयारीबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्या म्हणाल्या, “कोणतीही आपत्ती अचानक उद्भवू शकते. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित करणे गरजेचे आहे. लातूर पाटबंधारे विभाग व जिल्हा परिषदेच्या सिंचन प्रकल्पांची पाहणी करून सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच आपत्कालीन परिस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांची कार्यक्षमता वाढवावी.”
यासोबतच आपत्कालीन प्रतिसाद कार्यपद्धती (SOP) अद्ययावत करून ती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
आपत्ती निवारणासाठी साधनसामग्री आणि पूर्वतयारी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनीही आपल्या संबोधनात पूरस्थिती, ढगफुटी किंवा इतर नैसर्गिक आपत्तींच्या वेळी तातडीने मदत पोहोचवण्यासाठी प्रशासन सज्ज असावे, याकडे भर दिला.
या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी तालुका स्तरावरील तहसील कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना दिल्या जाणाऱ्या साधनसामग्रीची सद्यस्थिती तपासून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
विभागनिहाय कार्यवाहीची रूपरेषा
मॉन्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने विविध विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या. महसूल विभाग, जलसंधारण व पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग आणि शिक्षण विभाग या सर्व विभागांनी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.
आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय आवश्यक
सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी यांनी केले. तसेच या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे श्रीराम वाघमारे, अफरोज शेख, प्रतीक देशमुख, लक्ष्मण सादले, भारत पुंडे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांना आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आवश्यक तयारी करण्याची दिशा मिळाली असून सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.