
गृहराज्यमंत्री कदम म्हणाले, ‘सलमानच्या सुरक्षेसह संपूर्ण यंत्रणा पूर्णपणे…
अभिनेता सलमान खान याच्या घराच्या दिशेनं झालेला गोळीबार, त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या महाराष्ट्र अन् त्यातील मुंबईसह पंजाब, हरियाणा, देशातले 12 राज्य आणि कॅनडापर्यंत पोचलेल्या बिश्नोई गँगचे महाराष्ट्रात मोठ मोठाले प्लॅन असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं.
बिश्नोई गँगला महाराष्ट्रात दहशत निर्माण करायची आहे. त्यातून खंडणी गोळा करण्याचा प्रयत्न आहे, असा दावा करताच, त्यात त्याला आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे मंत्री कदम यांनी म्हटले आहे.
रमजान ईदच्या चाहात्यांना शुभेच्छा देताना अभिनेता सलमान खान हा बुलेट प्रूफ काचेच्या मागे दिसला. बिश्नोई गँगने त्याच्या घराच्या दिशेने केलेल्या गोळीबारानंतर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर सलमान खान याच्या सुरक्षिततेत वाढ केली आहे. सलमान खान याला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यावर बोलताना मंत्री योगेश कदम यांनी सलमान खान याला आवश्यक सुरक्षा देण्यात दिली गेली असल्याचे सांगितले.
बिश्नोई गँगच्या संदर्भात आपली यंत्रणा ही पूर्णपणे अलर्ट आहे. जी काही कारवाई केली आहे, ती तक्रारीवरून नाही तर सुमोटोची कारवाई होती. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क आहे. बिश्नोई गँगचा प्रयत्न चालू आहे की, महाराष्ट्रातल्या (Maharashtra) मोठ्या मोठ्या शहरांमध्ये दहशती घडवून खंडणी मागायची. यातून महाराष्ट्रात गँग स्थापन करून ते वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र तो काही आम्ही यशस्वी होऊ देणार नाही’, असे मंत्री योगेश कदम यांनी म्हटले.
खासदार राऊतांवर बोलण्यास नकार
शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत नेहमीच आक्रमक असतात. वक्फ विधेयक दुरुस्तीवर खासदार राऊत संसदेत चांगलेच आक्रमक झाले होते. यावर विचारल्यावर संजय राऊत यांच्यावर बोलण्याची काही गरज नाही, असे सांगून या व्यक्तीला आता महाराष्ट्राच्या जनतेनं संपवलेलं आहे. आणि जी व्यक्ती आमच्या मतांवर निवडून आलेली आहे. त्यामुळे अशा व्यक्तीवर आम्ही बोलणार नाही, असे सांगितले.
उद्धव ठाकरेंनी पवारांचे राजकारण समाजावे
वक्फ विधेयक दुरुस्तीवरील चर्चा सुरू असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन खासदार राज्यसभेत गैरहजर होते. त्यावर मंत्री योगेश कदम यांनी मी त्यावर काही बोलू शकणार नाही. परंतु शरद पवार साहेबांचे राजकारण करण्याची जी काही पद्धत आहे, ती आता तरी उद्धव ठाकरेंनी समजावून घेतली पाहिजे, असा टोला लगावला.