
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :उदगीर विधानसभा मतदारसंघातील उदगीर व जळकोट परिसरात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा सायंकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत पूर्णतः खंडित झाला. तब्बल सहा तासांच्या या व्यत्ययामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर त्रास सहन केला. उन्हाळ्याच्या तडाख्याने आधीच त्रस्त असलेल्या लोकांना विजेविना झोप येणे अवघड झाले होते.
विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असताना हा वीजपुरवठा खंडित होणे अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. सध्या अकरावी, बारावी, विविध पदवी अभ्यासक्रम, नर्सिंग, बीसीए, बीसीएस, बीए, बीकॉम, बीएससी, तसेच कला व वाणिज्य शाखांच्या अंतिम परीक्षांचा कालावधी सुरू आहे. विद्यार्थ्यांना रात्री अभ्यासासाठी आणि पुरेशी झोपेसाठी वीजेची अत्यंत गरज असते. मात्र वीज नसल्यामुळे अनेक विद्यार्थी रात्री अभ्यास करु शकले नाहीत तसेच झोपेचाही खोळंबा झाला.
नौकरी करणारे कर्मचारी वर्ग दिवसभर नोकरी करून घरी आल्यानंतर विश्रांतीसाठी रात्री वीजेची अपेक्षा करत असतात. गृहिणीही दिवसभराची कामे आटोपून शांत झोप घेण्याच्या तयारीत असतात. मात्र पंखे, कूलर, एसी न चालल्यामुळे घामाने न्हालेल्या लोकांनी उकाड्यामुळे अक्षरशः रात्रीचा जप करावा लागला. त्यातच डासांचा उपद्रवही मोठ्या प्रमाणावर वाढल्याने त्रास अधिकच वाढला.
या काळात पाण्याचीही टंचाई भासली. अनेक घरांमध्ये पाणी उचलण्यासाठी मोटारी, पंप हे वीजेवर चालणारे असल्याने पाणी भरून ठेवले नसल्यास लोकांना पाण्यासाठी देखील अडचणींचा सामना करावा लागला. विजेवर चालणाऱ्या बोअरवेल्समुळे पाणी मिळणे अशक्य झाले होते.
या संपूर्ण घटनेला फक्त वाऱ्याला जबाबदार धरता येणार नाही. नागरिक महावितरणकडून नियमितपणे स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार व तब्बल १६ टक्क्यांपर्यंतचे वीज शुल्क भरतात. त्यामध्येही वेळोवेळी वाढ होते. मग ग्राहकांना योग्य व सुसज्ज वीज सेवा का मिळत नाही? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी उर्फ नाना प्रणित (जिल्हा संघटक, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य) व शासन नियुक्त सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे (अतनूरकर) यांनी या संपूर्ण प्रकारावर संताप व्यक्त करत महावितरणवर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी सांगितले की, “आजचे युग हे विज्ञानयुग आहे. अंतराळात गेलेली सुनीता विल्यम्स परत पृथ्वीवर आली, आणि आपण मात्र थोडा वारा व पाऊस आला की वीजपुरवठा खंडित होतो असे बघत आहोत, ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे.”
महावितरणने आपली प्रणाली अद्ययावत करणे आवश्यक आहे. कुठे खांब वाकलेले आहेत, कुठे तारा झुलत आहेत, कुठे वाऱ्यामुळे तारा एकमेकांशी स्पर्श करतात, अशा बाबींची वेळोवेळी तपासणी करून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. येणाऱ्या मान्सूनपूर्व काळात अशा घटना वारंवार घडल्यास संपूर्ण परिसरात नागरिकांचा उद्रेक होऊ शकतो.
महावितरणने या संदर्भात तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी करत जोशी व शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, तसेच महावितरणचे अध्यक्ष, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांना ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन पाठवले आहे.
ग्राहकांनी दरमहा वेळेवर बिल भरायचे, पण त्यांना सेवा मिळत नाही, ही वस्तुस्थिती बदलली पाहिजे. “ग्राहक आहेत म्हणून महावितरण आहे” हे महावितरणने लक्षात ठेवावे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन महावितरणने भविष्यातील उपाययोजना तातडीने आखाव्यात, अन्यथा जनतेचा रोष अनावर होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.