
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी खेड/पुणे -बद्रीनारायण घुगे
राजगुरुनगर (पुणे)… पुणे-नाशिक महामार्गावर असलेलेइखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघातग्रस्त, गहाळ झालेल्या आणि चोरीच्या प्रकरणात सापडलेल्या बेवारस दुचाकी गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस स्टेशनच्या आवारात पडून आहेत. या दुचाकींच्या मूळ मालकांनी आपापल्या गाड्यांची ओळख पटवून त्या ताब्यात घ्याव्यात, अन्यथा येत्या काही दिवसांत खेड पोलीस स्टेशनच्या ताब्यातील सर्व दुचाकींचा कायदेशीर पद्धतीने लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली आहे.
खेड पोलीस स्टेशनच्या आवारात सध्या अपघातग्रस्त आणि बेवारस अशा एकूण ४३ दुचाकी आहेत. या गाड्यांचे मालकांनी तातडीने आपली कागदपत्रे घेऊन खेड पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा आणि गाडीची खातरजमा करून ती ताब्यात घ्यावी, असे आवाहन खेड पोलीस प्रशासनाने केले आहे. जर मालकांनी वेळेत प्रतिसाद दिला नाही, तर या सर्व दुचाकींचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू होईल. लिलावानंतर कोणत्याही प्रकारची हरकत मान्य केली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे म्हणाले, आम्ही दुचाकी लिलावाची प्रक्रिया सुरू करणार आहोत. पण त्यापूर्वी मूळ मालकांना त्यांच्या गाड्या ताब्यात घेण्याची शेवटची संधी देत आहोत. मालकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा. आपल्या दुचाकीची कागदपत्रे (RC बुक, विमा कागदपत्रे, ओळखपत्र इ.) घेऊन खेड पोलीस स्टेशनला भेट द्यावी.गाडीची खातरजमा केल्यानंतरच ती परत केली जाईल.
पोलीसांनी स्पष्ट केले आहे की, लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही तक्रारी किंवा हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यामुळे मालकांनी ही संधी सोडू नये आणि तातडीने आपल्या गाड्या ताब्यात घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. ही बातमी खेड परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची असून, संबंधितांनी त्वरित कार्यवाही करणे अपेक्षित आहे.