
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :श्रीराम नवमीनिमित्त उदगीर शहरात श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेली ही शोभायात्रा अत्यंत भाविक व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली.
या शोभायात्रेची सुरुवात माजी क्रीडामंत्री व विद्यमान आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते राम मंदिरात प्रभू श्रीरामांची आरती करून करण्यात आली. त्यानंतर प्रभू श्रीराम यांच्या आकर्षक पूर्णाकृती प्रतिमेची मिरवणूक शहरातून काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, भगवे झेंडे, पारंपरिक वेशभूषा आणि राम भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते.
शोभायात्रेत विविध सामाजिक संस्था, महिला मंडळे, युवक मंडळे यांचा सहभाग लक्षणीय होता. आकर्षक फलक, रथ सजावट, रामायणातील दृश्यांचे सादरीकरण आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली.
या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, राहुल केंद्रे, रामचंद्र तिरुके, विजयकुमार निटुरे, चंदन पाटील नागराळकर, मनोज पुदाले, बालाजी भोसले, श्रीमंत सोनाळे, बाळासाहेब पाटोदे, कुणाल बागबंदे, सतिश पाटील, अजय नवरखेले, दिलीप गायकवाड, भास्कर पाटील, आशिष अंबरखाने, अभिजित पाटील, संतोष फुलारी, प्रशांत ममदापुरे, अमोल अनकल्ले, राहुल सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमावेळी श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्टचे पदाधिकारी आणि उदगीर शहर व परिसरातील हजारो रामभक्त उपस्थित होते. संपूर्ण शहरात रामनवमीच्या पार्श्वभूमीवर उत्सवाचा आणि भक्तीचा माहोल अनुभवायला मिळाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली. शहरातील नागरिकांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेत शोभायात्रेला अधिकच गौरव प्राप्त केला.