दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड:तालुक्यातील मौजे धारासुर येथील प्राचीन आणि ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक गुप्तेश्वर मंदिर जतन, संवर्धन आणि जीर्णोद्धाराच्या कामांना गती देण्यासाठी राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी मेघना साकोरे बोर्डीकर यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री बोर्डीकर यांनी गुप्तेश्वर मंदिराच्या मुख्य फाउंडेशन मजबुतीकरण, मंदिराच्या चारही बाजूंनी असलेल्या कमी प्रमाणातील दगडगोटे आणि काळी माती बाहेर काढून नव्याने पाया मजबुतीकरण, तसेच पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या जीर्णोद्धाराच्या कामांच्या अनुषंगाने मंदिरालगत असलेल्या खाजगी मालकीच्या जमिनीचे भूसंपादन करण्याची गरज असल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्याचे आदेशही त्यांनी दिले. भूसंपादन प्रक्रियेस गती देण्यासाठी जिल्हाधिकारी परभणी व तहसीलदार गंगाखेड यांना कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
राज्य संरक्षित स्मारक असलेल्या गुप्तेश्वर मंदिराच्या जतन आणि जीर्णोद्धारासाठी शासन कटिबद्ध असून यासंदर्भातील कामे योग्य वेळी पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाने तात्काळ कृती करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री बोर्डीकर यांनी दिले आहेत.