
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
नांदेड देगलूर
शहरातील उस्मान कॉलनी येथील रहिवासी युसूफ गफूर शेख (वय ३५ वर्ष) याचे देगलूर-मदनूर रोडवर स्टार ऑटो इलेक्ट्रिशियन व टायर रिपेअर नावाचे दुकान आहे.१३ एप्रिल रोजी सदर मेकानिक व त्याचा भाऊ हबीब हे दोघेजण दुकानात काम करीत असता दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील वन्नाळी येथील समशेर लतीफ पठाण याने त्याच्या मालकीचा हायवा(क्र.एमएच २६ एडी १८०४) या दुकानासमोर आणून लावला.हायवा बाजूला काढण्यास सांगताच हायवा चालकाने, तुझ्या बापाची जागा आहे काय? असे म्हणून शिवीगाळ केली आणि गाडीतून उतरून थापडबुक्क्यांनी मारहाण केली.त्यावेळी हबीब शेखने सोडवा सोडव केली. तेवढ्यात हायवा चालकाने फोन करून मित्राला बोलावून घेतले.थोड्याच वेळात सुधाकर कावटवार हा त्याच्या कारमध्ये(क्र.एमएच ३८ व्ही ९९६६) बसून आला.तो तलवार घेऊन खाली उतरला आणि त्याने युसुफ शेख व हबीब या दोन भावंडांना थापड बुक्क्यांनी मारहाण करून तलवारीने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी दुकानाच्या आजूबाजूला असलेले सोहेल चाऊस, इमरान शेख, इफ्तेखार कुरेशी यांनी येऊन सोडवा सोडव केली. जास्त लोक जमा होऊ लागताच दोघेजण तलवार आणि गाडी सोडून पळून गेले. याप्रकरणी युसुफ शेखच्या तक्रारीवरून देगलूर पोलीसांनी समशेर पठाण व सुधाकर कावटवारच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम ११५(२),३५२,३५१(२)३(५) शस्त्र अधिनियम ४,५ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाळ इंद्राळे करीत आहेत. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक झाली नसली तरी आरोपींना पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आल्याचे गोपाळ इंद्राळे यांनी दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधींना सांगितले.