
नाना पटोलेंवर सोलापुरातील पदाधिकाऱ्याचा गंभीर आरोप…
गुजरातमध्ये भाजपसोबत काम करणाऱ्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपसोबत युती केली आहे.
या नेत्यांचे काय करणार, असा सवाल काँग्रेसच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी उपस्थित केला.
काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक मोहन जोशी यांनी मंगळवारी दुपारी काँग्रेस भवनात पक्ष बांधणीसाठी बैठक घेतली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, सातलिंग शटगार, जगुलकिशोर तिवाडी, गुरुनाथ म्हेत्रे, अर्जुन पाटील, अशोक देवकते, मोतीराम चव्हाण, जिल्हा महिला अध्यक्षा शाहिन शेख, प्रा. सिद्राम सलवदे, आदित्य फत्तेपूरकर आदी उपस्थित होते. सलवदे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीबद्दल प्रश्न उपस्थित केले. माध्यमांतून या युतीबद्दल माहिती मिळत आहे. आम्हाला लोक याबद्दल प्रश्न विचारत आहेत. काय उत्तर देणार, असा सवाल त्यांनी केला.
पटोलेंनी वाटोळे केले : पवार
नंदकुमार पवार म्हणाले, नाना पटोले यांनी जिल्हा काँग्रेसचे वाटोळे केले. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. हा राजीनामा अद्याप मंजूर केलेला नाही. पक्षाला जिल्हाध्यक्ष नाही. लवकरात लवकर नियुक्ती व्हावी.
आदित्य फत्तेपूरकर म्हणाले, जे लोक पक्षाचे सदस्य नाहीत त्यांना पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली. यातून कार्यकर्त्यांनी काय धडा घ्यायचा. सांगोल्याचे अभिषेक कांबळे म्हणाले, पक्षाने विधानसभा निवडणुकीत १५ हजार रुपयांचा निधी घेतला. हा निधी देणाऱ्यांना उमेदवारी देण्याचे प्राधान्य होते. उलट दुसऱ्यांना उमेदवारी देण्यात आली. आता हे १५ हजार रुपये परत करा. हत्तुरे म्हणाले, पक्षाचे नेते कार्यकर्त्यांना सन्मान देत नाहीत. यातून पक्ष कसा वाढणार. दरम्यान, पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचवू, असे निरीक्षक मोहन जोशी यांनी सांगितले.
पक्षनिरीक्षक मोहन जोशी यांनी मंगळवारी शहरातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी संघटनात्मक कामांचा आढावा सादर केला. यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, आरिफ शेख, सुशीला आबुटे, अलका राठोड, विनोद भोसले, मा. नगरसेविका परवीन इनामदार, फिरदोस पटेल, भारती ईप्पलपल्ली, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, वाहिद विजापुरे, नजीब शेख, तिरुपती परकीपंडला आदी उपस्थित होते.