भारतीय संघाचा माजी स्टार फलंदाज विनोद कांबळी हा गेल्या काही काळापासून आरोग्य आणि आर्थिक समस्यांशी झुंजताना दिसत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात यूरिन इन्फेक्शनमुळे विनोद कांबळीची प्रकृती खूपच खालावली होती.
त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विनोद कांबळीची तब्येत बिघडल्याचं ऐकल्यानंतर सुनील गावस्कर यांनी त्याला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सुनील गावस्कर आणि विनोद कांबळी यांची भेट झाली होती. त्यानंतर आता सुनील गावस्कर यांच्या संस्थेने मोठा निर्णय घेतला आहे.
सुनील गावस्कर यांनी गरजू खेळाडूंना मदत करण्यासाठी 1999 मध्ये चॅम्प्स फाउंडेशन या संस्थेची सुरुवात केली होती. या संस्थेच्या माध्यमातून विनोद कांबळी यांना 1 एप्रिल 2025 पासून मदत करण्यास सुरुवात केली आहे. सुनील गावस्कर यांची संस्था विनोद कांबळीला प्रत्येक महिन्याला 30 हजार रुपये देणार आहे. तर वैद्यकीय खर्चासाठी आणखी 30 हजार रुपये दिले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे 60 हजार रुपये विनोद कांबळी यांना आयुष्यभरासाठी दिले जाणार आहेत. दरम्यान, सुनील गावस्कर यांच्या संस्थेच्या माध्यमातून विनोद कांबळी हा मदत घेणारा दुसरा क्रिकेटपटू आहे. याआधी माजी क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांना सुनील गावस्कर यांच्या संस्थेने मदत केली होती.
दरम्यान, यूरिन इन्फेक्शनमुळे विनोद कांबळीला डिसेंबर महिन्यात भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही गोष्ट कमी राहणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, त्यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांनी डॉक्टरांना दिल्या होत्या. तसेच विनोद कांबळीची सध्याची परिस्थिती पाहता कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वैयक्तिक 5 लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केली होती. महत्वाचे म्हणजे येणाऱ्या काळात विनोद कांबळीला अजून मदत करण्याचे आश्वासन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्याचेही त्यावेळी मंगेश चिवटे यांनी सांगितले होते.
