
शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांचं AI च्या सहाय्याने तयार करण्यात आलेलं भाषण दाखवण्यात आलं. या AI भाषणात भाजपवर जोरदार टीका करण्यात आली.
शिवसेना-भाजप युती, तसेच नंतर झालेली पक्षफूट यावर भाष्य करताना, “भाजपला महाराष्ट्रात शिवसेनेने खांदा दिला, पण स्वतःला निष्ठावंत म्हणवणारेच शेवटी गद्दार ठरले, असे म्हणण्यात आले. या AI भाषणानंतर शिवसेना शिंदे गटाने बाळासाहेबांचे खरे विचार आमच्यासोबत आहेत, असे म्हणत जोरदार पलटवार केला. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, तंत्रज्ञान पुढे गेले आहे. विज्ञान पुढे गेले आहे. स्वतः नरेंद्र मोदी यांनी AI तंत्रज्ञानाबाबत देश कसा पुढे नेतोय, याबाबत काही भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा या लोकांशी काय संबंध? अमित शाह यांनी एक बनावट संघटना निर्माण केली. निवडणूक आयोगाला शिवसेना हे नाव द्यायला लावले. म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांचा अधिकार होत नाही.
जर अमित शाह यांच्यावर काही केलं असतं तर…
त्यांनी धर्मवीर सिनेमा काढला. हे त्याचे 5-25 भाग काढतील. तो चित्रपट मी काही पाहिला नाही. या लोकांपेक्षा मी आनंद दिघे यांना जास्त ओळखतो. त्यांच्या नावाने बनावट विचार, बनावट संवाद निर्माण केलेले चालले का? तुम्ही धर्मवीर यांच्याबाबत आम्हाला शिकवू नका. तुमच्यापेक्षा जास्त आम्ही त्यांच्या जवळ राहिलेलो आहेत. राजन विचारे त्यांच्या फार जवळ होते. तुम्ही आनंद दिघे यांना ज्या बनावट पद्धतीने पडद्यावर आणले, त्या संदर्भात बोलला तर आम्ही वाद करू. माननीय बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे वडील आहेत. शिवसेनेचे ते निर्माते आहेत. आम्ही जर अमित शाह यांच्यावर काही केलं असतं तर ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. तर त्यांची तक्रार योग्य आहे. आम्ही शिवसेना प्रमुखांवर केले आहे. तुमचा काय संबंध आहे? असा म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटाला डिवचले आहे.
काँग्रेसमधून आलेल्या पोकळ शंभूराजेंनी इतिहास समजून घ्यावा
आनंद दिघे असताना संजय राऊत हे शिवसेनेत होते तरी का? आनंद दिघे यांनी काय शिकवण दिली हे संजय राऊत यांनी आम्हाला सांगू नये, असे वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मग काँग्रेस पक्षातून आलेले शंभूराज देसाई शिकवणार का? काँग्रेस पक्षातून बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई आनंद दिघे किंवा बाळासाहेब ठाकरे शिकवणार का? इतकी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही. त्यांनी इतिहास वाचावा. तो खटला काय होता आणि त्यात संजय राऊत यांची भूमिका काय होती? हे एकदा पोकळ शंभूराजेंनी समजून घ्यावे. त्यांचे पक्षप्रमुख अमित शाह यांनी त्यांना तंबी दिलेली आहे की, फडणवीस यांची चाकरी करा नाहीतर सरकारमधून दूर व्हा. तुमच्याशिवाय हे सरकार चालेल. फार शहाणपणा करू नका, असे प्रयुत्तर त्यांनी शंभूराज देसाई यांनी दिले.
शिवसेनेला अशा धमक्या देऊ नका
ठाकरेंच्या नाशिकमधील शिबिराचा शेवटचा फोटो काढून ठेवा, एका महिन्यात सगळे पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेकडे येतील, असा दावा खासदार नरेश मस्के यांनी केला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ठीक आहे. काही हरकत नाही. तुम्ही फोटो काढून ठेवा आणि आम्हाला पाठवा. तुमच्या आयुष्यात दुसरं काही आहे का? लुटलेला पैसा राजकीय कार्यकर्त्यांना विकत घेण्यासाठी वापरायचा. हा नव्या धर्मवीरांचा धर्म आहे. शिवसेनेला अशा धमक्या देऊ नका. एकेकाळी अंडरवर्ल्डचे लोक अशा प्रकारे धमक्या द्यायचे. त्याच पद्धतीने या टोळ्या चालवत आहेत. ज्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत ते दुसरे काय करणार? अमित शाह त्याच्या पक्षाचे पवित्र जपताय, पण ते एसंशि आणि अजित पवार गटाची पूर्ण वाट लावणार, असे त्यांनी म्हटले.
अमित शाह एसंशि शिवसेनेचे प्रमुख
संजय राऊत पुढे म्हणाले की, गिरीश महाजन यांचे मानसिक संस्था का बिघडले आहे हे आपल्याला माहित आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी देशात सुट्टी जाहीर करावी असे सांगितले. मिस्टर महाजन जरा ऐकून घ्या, कानातले बोळे काढा. महाराष्ट्रात सुट्टी आहे. देशात सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. ती मागणी का केली? तर एसंशि गटाचे पक्षाचे प्रमुख अमित शाह रायगडावर आले आणि त्यांनी शिवाजी महाराजांवर प्रवचन दिले. त्यातल्या अर्ध्या गोष्टी खोट्या आहेत. शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला. औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला. हे त्यांचे छत्रपती शिवरायांवर प्रेम आहे. गिरीश महाजन यांना ऐकायला कमी येत आहे का? असा टोला त्यांनी यावेळी गिरीश महाजन यांना लगावला