
काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांच्या सत्यजित तांबेंना आवडतं देवेंद्रजींचं नेतृत्व…
देशात 2014 पासून भाजपची लाट आली. या लाटेतून काँग्रेस सावरत नाही, तोच 2019मध्ये दुसरा झटका बसला. यानंतर ही काँग्रेस सारवली नाही. भाजपची तिसरी लाट 2024मध्ये होती.
या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने काहीशी ताकद दाखवली. पण, म्हणावी तेवढी ताकद दाखवली नसल्याने, ती अपुरीच ठरली. यानंतर महाराष्ट्रासह देशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पुरता धुव्वा उडत आहे.
महाराष्ट्रात महायुतीसमोर महाविकास आघाडीचा पुरती उद्धवस्त झाली. यात काँग्रेस पुरती घायळ झाली. महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये इनकमिंग होत असतानाच, काँग्रेसचे दिग्गज नेते भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची वाट धरत आहेत. पुण्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते संग्राम थोपटे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. यावर नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.
आमदार सत्यजित तांबे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. सत्यजित तांबे भाजपमध्ये (BJP)जाऊ शकतात, तसे वारे वाहू लागले आहेत, त्यावर सत्यजित तांबे यांनी मोठा खुलासा केला. ते म्हणाले, भाजपमधून माझ्याशी कोणताही संपर्क नाही. परंतु मी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. मला देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आवडतं. काम करताना ते ताकद देतात. दूरदृष्टीचा नेता आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना मजा येत आहे. काम करताना आनंद घेत आहे. त्यामुळे ते सांगतील त्यापद्धतीने पुढची राजकीय वाटचाल निश्चित असेल, असेही सत्यजित तांबे यांनी सांगितले.
काँग्रेससाठी हा संक्रमाचा काळ आहे. बऱ्याच पातळीवर काँग्रेसकडून (Congress)कार्यकर्त्यांचा भ्रमनिराश होत आहे. त्यामुळे अनेक नेते, पदाधिकारी निर्णय घेण्याच्या तयारी आहेत. एका बाजुला वाढत असलेली सत्ता आणि दुसऱ्या बाजुला ताकद देण्याची एक पद्धत दिसते. काँग्रेसमध्ये देशापासून ते गल्लीपर्यंत संघटनात्मक काम होताना दिसत नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य अन् निराशा नक्कीच आहे’, असा दावा आमदार तांबे यांनी केला.
काँग्रेस श्रेष्ठींना सांगून कंटाळलो
‘महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे 42आमदार होते. त्यावेळी काँग्रेसचे आमदार निवडून देखील येणार नाही, अशी परिस्थिती होती. त्यावेळी काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना बळ मिळेल, नवसंजीवनी मिळेल, महामंडळांवर नियुक्ती मिळेल, असे वाटत होते. पण तसे झाले नाही. आयसीयुमध्ये असलेला रुग्ण बरा होऊन बाहेर पडेल, असे वाटत होते. पण तसे झाले नाही. काँग्रेसने उलट जनाधार असलेले लोक बाजूला ठेवले. त्यातून ही परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. काँग्रेस श्रेष्ठींना लक्ष द्या, असे सांगून देखील आम्ही कंटाळलो’, असा टोला देखील सत्यजित तांबे यांनी लगावला.
माझी हकालपट्टीच केली
नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी माझी हकालपट्टीच केली, असा गौप्यस्फोट करताना माजी आमदार संग्राम थोपटे यांना पराभवानंतर एका नेत्यांनं देखील फोन केला नाही, ही शोकांतिका आहे, या पक्षाची! मी निवडून आलो, त्यानंतर पक्षात पुन्हा घ्या, अशी आम्ही मागणी करत होतो. परत घेतलं नाही. निवडणुकी काळात देखील पाठिंबा मागत होतो, तो दिला नाही, त्यामुळे जनाधार असलेल्या नेत्यांची अॅलर्जी काँग्रेसच्या वरिष्ठ श्रेणीत बसलेल्या नेत्यांना आहे, असा टोला आमदार सत्यजित तांबे यांनी लगावला. आता जनाधार नसलेले लोकं नेतृत्व करत असल्याने काँग्रेसची परिस्थिती अशीच राहिल, असा घणाघात आमदार तांबे यांनी केला.