
मोठ्या आवाजात कलमा म्हटला अन् संपूर्ण कुटुंब बचावलं…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील 6 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
या भ्याड हल्ल्यातील अनेक प्रसंग आता समोर येत आहेत. पहलगाम येथील भ्याड हल्ला चार दहशतवाद्यांनी केल्याची माहिती आहे. याच हल्ल्यातून बचावलेल्या देबाशिष भट्टाचार्य यांनी यासंदर्भातील कालच्या घटनेबद्दल माहिती न्यूज 18 आसाम या वृत्तवाहिनीला दिली. ते बैसरण येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी तिथंच होते.
भट्टाचार्य म्हणाले, ते त्यांच्या कुटुंबासह एका झाडा खाली झोपले होते. त्यावेळी अचानक लोकांच्या हालचाली वाढल्या. लोक कलमा वाचत होते, त्यांच्यानुसार मी देखील कलमा वाचण्यास सुरुवात केली. काही क्षणात तिथं दहशतवादी तिथं आले, त्यापैकी एक जण आमच्या दिशेनं आला आणि बाजूला झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात गोळी मारली.
यानंतर दहशतवादी भट्टाचार्य यांच्या दिशेनं गेला आणि काय करत आहात असा प्रश्न विचारला. यावर भट्टाचार्य यांनी मोठ्या आवाजात कलमा वाचन सुरु केलं. ते म्हणाले की मला असं करण्यास का भाग पाडलं गेलं माहिती नाही. मात्र, कोणत्या तरी कारणामुळं तो दुसरीकडे निघून गेला.
देवाशिष भट्टाचार्य म्हणाले परिस्थितीचा अंदाज घेत गपचूप तिथून उठलो आणि पत्नी आणि मुलासह ऊंचावरील भागाच्या दिशेनं गेलो, दोन तास चालत राहिलो. मार्ग चुकलो होतो मात्र त्यावेळी घोड्यांच्या टापांचे निशाण होते, त्याच्यावरुन चालणं सुरु ठेवलं आणि एका घोडेस्वाराजवळ पोहोचलो. त्याच्या मदतीनं हॉटेलमध्ये पोहोचलो, घाबरलेलो पण सुरक्षित होतो, असं भट्टाचार्य म्हणाले. यापुढं बोलताना जीवंत असल्यावर विश्वास बसत नसल्याचं त्यांनी म्हटलं. ते आणि त्यांचं कुटुंब श्रीनगरमध्ये आहे.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला बैसरण येथे झाला. पर्यटकांच्या एका गटावर लष्कर-ए-तोयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंट या दहशतवादी संघटनेनं भ्याड हल्ला केला. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
दहशतवाद्यांनी महिला आणि पुरुषांना वेगवेगळं केलं. यांनतर पुरुषांना स्नायपरनं गोळ्या मारण्यात आला. सुरक्षा दलांनी ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यांच्या शोधासाठी रात्रभर सर्च ऑपरेशन राबवलं.
महाराष्ट्रातील मृतांची नावे-
1) अतुल मोने – डोंबिवली
2) संजय लेले – डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल
जखमींची नावे-
1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल