
CM फडणवीसांनी घेतला राहुल गांधींचा समाचार !
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधाने करत असतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानांवरून राहुल गांधींविरोधात देशातील न्यायालयांमध्येही याचिका दाखल करण्यात आल्यात.
अशातच यातच सर्वोच्च न्यायालयात झालेल्या एका सुनावणीदरम्यान राहुल गांधींना कोर्टाने खडेबोल सुनावले. दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. यावेळी फडणवीसांनी राहुल गांधींवरही टीका केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने अपमान करणाऱ्या राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयानेच चपराक लावलेली आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. राहुल गांधी कायम स्वातंत्र्य सैनिकांचे अपमान करतात. तसेच ज्या भाषेत ते टीका करतात, त्यामुळं संपूर्ण देशवासीयांचे मन दुखावले गेले. आता आता दररोज संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का? हा माझा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे स्वातंत्र्य संग्रामसेनानींचा अपमान राहुल गांधी करणार नाहीत, अशी मला अपेक्षा आहे, असं फडणवीस म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं ?
स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना इशारा दिला आहे. शुक्रवारी न्यायालयाने राहुल गांधींना वीर सावरकरांसारख्या व्यक्तींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि तुम्ही त्यांना अशी वागणूक देता, अशा शब्दात सुनावले. तसेच भविष्यात अशा प्रकारची टिप्पणी करू नका, अन्यथा न्यायालय स्वतः त्याची दखल घेईल, असा इशाराही कोर्टाने दिला होता.
वीर सावरकरांबद्दल राहुल गांधींनी केलेलं विधान हे बेजाबदारपणाचं होतं, त्यांनी असं बोलायला नको होतं, असं कोर्टाने म्हटलं.