
शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले…
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला प्रचंड मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. यानंतर ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसले. संपूर्ण राज्यातून नेते, पदाधिकारी, हजारो कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात गेले.
ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात जाण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार आणि राज्य संघटक पदावर असलेले चंद्रहार पाटील हेही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यावर आता चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अनेकार्थाने राज्यभरात चर्चिली गेली. या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. विशाल पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट मिळणार होते. परंतु, अगदी शेवटपर्यंत या जागेचा दावा ठाकरे गटाने सोडला नाही आणि चंद्रगार पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली. यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोकण दौऱ्यावेळी चंद्रहार पाटील यांची शिंदेसेनेतील नेत्यांसह उपस्थिती दिसली. यावरून चंद्रहार पाटील आता शिवसेना शिंदे गटात जाणार असे दावे राजकीय वर्तुळात होऊ लागले. परंतु, चंद्रहार पाटील यांनी एक्सवर एक पोस्ट करत याबाबत थेट भाष्य केले.
…तर भेटी घेण्यात काही गैर नाही
चंद्रहार पाटील एक्सवरील पोस्टमध्ये म्हणतात की, मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त रत्नागिरी येथे गेलो असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २००५ साली पासून, म्हणजेच जवळपास २० वर्षापूर्वी पासूनचे माझे मित्र व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांनी मला स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले, भोजन करून १५ ते २० मिनिटांत मी बाहेर पडलो. या वेळी राज्यातील क्रीडा क्षेत्राबाबत चर्चा झाली, परंतु माझ्या हितशत्रूंनी मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला आहे. या हितशत्रूंचा बंदोबस्त केलेला लवकरच जनतेला पाहायला मिळेल, हे नक्की, असे चंद्रहार पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दुसऱ्या एका पोस्टमध्ये पाटील म्हणतात की, राजकीय डावपेचा पेक्षा, ज्या क्रीडा क्षेत्राने मला ओळख मिळवून दिली ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे, राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी शासनातील महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेण्यात मला काही गैर वाटत नाही. याही पुढे गरज भासल्यास क्रीडा क्षेत्रासाठी कुणाचीही भेट घेण्यात मला संकोच वाटणार नाही, असेही चंद्रहार पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.