
मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य चर्चेत…
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. हिंदूंनी खरेदी करण्यापूर्वी दुकानदाराचा धर्म विचारावा आणि खात्रीसाठी हनुमान चालीसा म्हणायला सांगावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
त्यांच्या या वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे शुक्रवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना मंत्री नितेश राणे म्हणाले, ‘पहलगाममध्ये त्यांनी (दहशतवाद्यांनी) मारण्यापूर्वी आपला धर्म विचारला. त्यामुळे आता हिंदूंनीही कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी विक्रेत्याचा धर्म विचारायला हवा.’
‘जर ते तुम्हाला तुमचा धर्म विचारून मारत असतील, तर तुम्हीही सामान घेण्याआधी त्यांचा धर्म विचारायलाच पाहिजे,’ असे ते म्हणाले. हिंदू संघटनांनीदेखील अशीच मागणी पुढे न्यावी, असे आवाहनही राणे यांनी केले. या वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट असताना, नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
काही दुकानदार आपला धर्म लपवतील किंवा खोटे सांगतील, अशी शक्यता वर्तवत राणे (Rane) पुढे म्हणाले, ‘खरेदीला गेल्यावर त्यांना धर्म विचारा. जर ते हिंदू असल्याचे म्हणाले, तर त्यांना हनुमान चालीसा म्हणायला सांगा. जर त्यांना ती येत नसेल, तर त्यांच्याकडून काहीही विकत घेऊ नका.’
दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटक मारले गेले होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांनी नाव-धर्म विचारून आणि काहींना कलमा म्हणायला लावून गोळीबार केला होता. याच क्रूर घटनेच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी हे विधान केले आहे.